Breaking News

भारतातील सामाजिक लढ्यातील शिलेदार डॉ. ऑम्व्हेट यांचे निधन सांगलीतील कासेगांव येथे अंत्यसंस्कार

सांगली-मुंबई: प्रतिनिधी

अमेरिकेसारख्या देशात जन्माला येवून ही तेथील भौतिक आणि सधनतेचा कोणताही मोहात न अडकता भारतातील जातीय-वर्ग लढ्यातील एक बिनीची शिलेदार म्हणून काम करण्याचे धाडस करणाऱ्या डॉ.गेल ऑम्व्हेट यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर कासेगांव येथील क्रांतिकारक पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतातील अनेकांना युरोप आणि अमेरिकेतील सधनता आणि त्यातील भौतिक सुखाचे आकर्षण असल्याने सर्वच जातीतील अनेकजण हल्ली अमेरिका, युरोपमध्ये जावून रहिवाशी बनू पहात आहेत. तर याच देशातील अनेक जण कधी धर्माच्या तर कधी मोक्ष प्राप्तीच्या नावाखाली भारतात येवून दांभिक बाबा-महाराजांच्या नादाला लागून स्वत:ला उध्दवस्त करून घेत आहेत. यापार्श्वभूमीवर डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी या सर्व गोष्टीं फाटा देत भारतातील महिला, जातीय लढे, परित्यक्ता स्त्रिया, आदीवासी चळवळीत स्वत:ला झोकून देत त्या इथल्याच झाल्या.

भारतात आल्यानंतर त्यांनी विविध चळवळींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करताना त्या कालांतरांने या चळवळीच्या भाग बनल्या. या चळवळीवर आधारीत नॉन ब्राम्हीण मुव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया हा प्रबंध लिहून कॅलिफोर्नियातील बर्कली विद्यापीठात सादर करून डॉक्टरेट मिळविली. त्यांच्या आधी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा अभ्यास कोणीच केला नव्हता. त्यानंतर त्यांनी बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी केली. तसेच त्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समित्याच्या सदस्या म्हणून काम करत राहील्या.
महात्मा फुले यांच्या सत्यसोधक चळवळीवर आधारीत लिहिलेल्या नॉन ब्राम्हीण मुव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया पुस्तक वाचून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम हे प्रभावित झाले होते. आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने ते नेमकी डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्याशी चर्चा करण्यासाठी अनेक वेळा भेट घेत असत.

स्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या इंदूताई पाटणकर यांची भेट झाली आणि त्यांचे चिरंजीव डॉ. भारत पाटणकर यांच्याशी पुढे ओळख झाली आणि त्या पाटणकरांच्या घराच्या सून झाल्या. डॉ. भारत पाटणकर यांनीही स्वत:चे मेडिकलचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीला वाहून घेतले.

डॉ.गेल ऑम्व्हेट यांनी तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या.
डॉ. गेल या पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वास मध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले. त्याचबरोबर FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार म्हणून काम पाहिले.

डॉ. गेल यांनी कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया आदी पुस्तकांचे लिखाण केले आहे.

Check Also

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन …

Leave a Reply

Your email address will not be published.