Breaking News

मराठा समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी पाच लाख उद्योजक तयार करणार छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजनेचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी

मराठा समाजातील होतकरू तरुणांना केवळ नोकरी, रोजगार देण्याच्या उद्देशाने नाही. तर पुढच्या काळात नोकऱ्या देणारे पाच लाख उद्योजक बनवण्याचा उद्देश असल्याचे सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत छ.राजाराम महाराज कौशल्य विकास अभियानाचा शुमारंभ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.  मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सक्षमीकरण करून आर्थिक दुर्बल घटकातील तरूणांना उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार महामंडळाच्या अंतर्गत छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास अभियानाच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा लोकार्पण करण्यात आले. सहा लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप ही करण्यात आले. वैयक्तीक कर्ज परतावा योजनेत १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार असून त्याचे १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज सरकार भरणार आहे. गट कर्ज योजनेत जास्तीत जास्त ५० लाखांचे कर्ज दिले जाणार असून गट शेतीसाठीही १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. तसेच जर सामूहिक उद्योग आणि शेतीसाठी काही जण प्रयत्न करत असतील तर त्या समूहाला एक कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी  असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुढच्या दोन वर्षात सुमारे अडीच लाख तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करण्यात येईल तर त्यापुढच्या टप्प्यात आणखी अडीच लाख तरुणीना संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काळाच्या ओघात सामान्य शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आला आहे .पण वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना लाभ होईल. जमिनीच्या वाटपातही अनेकांना अत्यल्प जमीन आली आहे. त्यामुळे समाजातील अनेकजण अल्पभूधारक झाले असून त्यांनाही मदतीचा हात देण्यात येणार आहे. मराठा मोर्चा नंतर खऱ्या अर्थाने या समाजातले प्रश्न अधोरेखित झाल्याचे नमूद करत राज्यात एकवटलेला मराठा समाज कृष्णासारखे विराट रूप घेऊन बाहेर आला. त्या विराट रूपाचा आदर करताच आम्ही कामाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

मागासवर्ग आयोगाने आरक्षणाचा अहवाल लवकर द्यावाः चंद्रकांत पाटील

सरकारला साढे  तीन वर्ष उलटली असली तरी भाजपने निवडणुकीपूर्वी मराठा आणि धनगर समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत . त्यातच लाखोंचे मोर्चे काढून मराठा समाजाने सरकारपुढे आव्हान उभे केल्याने सरकार हतबल दिसत असून मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचा अहवाल लवकर द्यावा अशी विनंती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *