Breaking News

अण्णा हजारेंना हवेत व्यवस्था परिवर्तनासाठी कार्यकर्त्ये फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होत नाही तर व्यवस्था परिवर्तन गरजेचे

मुंबई : प्रतिनिधी

दिल्लीतील मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी पुकारलेल्या आंदोलनाचा फियास्को झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पुन्हा व्यवस्था परिवर्तन चळवळ उभारण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे या चळवळीसाठी नव्याने कार्यकर्त्ये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु असून  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्यात मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हापातळीवर प्रत्येकी १५ कार्यकर्त्ये निर्माण करण्याचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये अण्णा हजारे यांनी केले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात आपण मोठमोठी धरणे, रस्ते, इमारती उभ्या केल्या. परंतू मी स्वतःसाठी जगत असताना माझा शेजारी, गाव, समाज, देश याचे मी काही देणे लागतो या जाणिवेतून निष्काम भावनेतून फलाची अपेक्षा न करता गाव, समाज, आणि देशाची सेवा म्हणून मी कार्य करत राहील अशी ध्येयवादी माणसे ७० वर्षांनंतर उभी झाली नाहीत हे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते पक्ष पार्टी विरहीत गाव, देश व समाजाच्या हिताकरीता आपापल्या परिने काम करत आहेत. मात्र सामाजिक काम करणारे कार्यकर्ते संघटित नसल्याने त्यांचा अपेक्षित प्रभाव पडत नाही. म्हणून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीची जाणिव असलेले जात पात धर्म वंश इत्यादी भेद न पाळणाऱ्या कार्यकर्त्यांचे संगटन महाराष्ट्र व देशात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निसर्गाचा नियम आहे की दाण्याने भरलेली ज्वारी, बाजरी, मक्याची भरघोस कणसे शेतात तेव्हाच दिसतात जेव्हा एक दाणा स्वतःला मातीत गाडून घेतो. अशा प्रकारे समाज व राष्ट्रहितासाठी गाडून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची देशाला गरज आहे. त्यासाठी सामाजिक व राजकिय दृष्टीकोन असलेल्या ध्येयवादी कार्यकर्त्यांनी स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र करून द्यायचे आहे की, मी शुद्ध आचार, शुदध विचार निष्कलंक जीवन ठेवीन. वाईट गोष्टींचा जीवनात डाग लागू देणार नाही. समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठी थोडा का होईना त्याग करील. कुठल्याही राजकिय पक्ष अथवा पार्टीतर्फे कोणतीही निवडणूक लढविणार नाही. समाज व देशाची निष्काम भावनेने सेवा करील असे प्रतिज्ञापत्र करून देणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन गाव पातळीपासून उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सामिल होण्यासाठी गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने असे प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक आहे.  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्यात मध्यवर्ती कार्यकारी मंडळ असेल. प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव स्तरावर त्यांच्या शाखा असतील. जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर चारित्र्यशील कार्यकर्त्यांची निवड स्थानिक प्रतिज्ञापत्र दिलेल्या कार्यकर्त्यांनी करावयाची आहे. बऱ्या वाईट गोष्टींना तेच जबाबदार असतील. प्रत्येक गावात प्रतिज्ञापत्र भरून देणारे किमान १५ चारित्र्यशील कार्यकर्त्यांची निवड जिल्हा शाखेने तालुका शाखेच्या सहकार्याने करायची आहे. अशी निवड केल्यानंतर त्यास मध्यवर्ती मंडळाची मान्यता घेणे आवश्यक आहे.  अशा पद्धतीने एका गावामधून किमान १५ चारित्र्यशील सदस्य झाले आणि तालुक्यात १०० गावे असतील तर तालुक्यातील किमान १५०० चारित्र्यशील सामाजिक कार्यकर्त्यांचे निर्माण होतील. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अहिंसेच्या मार्गाने मोर्चे, धरणे, मौन, उपोषणे अशा मार्गाने आंदोलने केली तर तालुका स्तरावरील जनतेचे प्रश्न सोडविता येऊ शकतील. तसेच वरीलप्रमाणे संघटन झाल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मिळून ४ ते ५ लाख चारित्र्यशील कार्यकर्ते संघटित होतील. त्यातील किमान दोन लाख कार्यकर्ते जरी आंदोलनात उतरले आणि सरकारचे नाक दाबले तरी तोंड उघडेल व जनतेचे प्रश्न मार्गी लागणार असल्याची आशाही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *