Breaking News

शरद पवारांच्या वाढदिनापासून शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदान

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात शनिवार १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवसापासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले.
दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह खासदार श्रीमती सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदी उपस्थित होते.
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला.
यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे आणि सोशल डिस्टंसिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या साऱ्यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *