Breaking News

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल परीचे नियेाजन करा मंत्री, ॲड. अनिल परब यांचे निर्देश

कोरोना आणि संप या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षात एका वेगळ्याच परिस्थितीशी झुंज देत होते. या काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले. दरम्यान, संपानंतर कामावर रूजू झालेल्या कामगारांच्या सकारात्मक मानसिकतेसाठी समुपदेशन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सध्या सुट्टीचा मोसम सुरु आहे. या काळात सर्वसामान्य प्रवाशांना अधिकाधिक एसटीची वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या राज्यभरातील विभाग नियंत्रकांसोबत मुंबईतील मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहतूक सेवा, प्रवाशी संख्या तसेच उत्पन्न वाढविण्याबरोबरच वाहतूक सुरु करण्याबाबत भेडसवणाऱ्या विविध समस्यांवर या बैठकीत उहापोह करण्यात आला. यावेळी विभाग नियत्रकांची मतेही जाणून घेण्यात आली. या बैठकीसाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळातील विविध विभागाचे महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री ॲड. अनिल परब बोलत होते.
गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर आपली एसटी पुन्हा सुरू झाली आहे. आपले कर्मचारी संपावर होते म्हणून आपण काही करू शकलो नाही. परंतू आता सर्व वाहतूक पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी, विस्कळलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पूर्वी जे भारनियमन होते त्यात वाढ कशी होईल यासाठी सर्व गोष्टींचे नियोजन करावे, त्यासाठी पूर्वीचे पॅटर्न बदलावे, असे सांगतानाच आवश्यक ठिकाणी महामंडळाकडून योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शाळांच्या वेळेचं नियोजन करा!
पुढील महिन्यापासून शाळा सुरु होतील. काही शाळांची वेळ बदललेली असेल. त्यामुळे एकाच मार्गावरील वेगवेगळ्या शाळांसाठी बदललेल्या वेळेनुसार अनेक गाड्या सोडल्या जातात. त्याऐवजी शाळांच्या वेळेचं नियोजन करून बस सोडाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावर्षी १ हजार इलेक्ट्रिक बसेस धावणार
यावर्षी किमान १ हजार इलेक्ट्रीक बसेस आपल्याला सुरू करायच्या आहेत. तो आपला उद्देश आहे, असे सांगतानाच पर्यावरणपूरक अशा २ हजार सीएनजी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *