Breaking News

शिवसेनेला ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही धक्का: एक नगरसेविका मात्र विरोधात ठाणे महापालिकेतील ६६ तर नवी मुंबईतील ३०-३२ जण शिंदे गटात जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सेनेतील ४० आमदारांना घेवून स्वतंत्र चूल मांडत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. या बंडाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर पडत असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर ६७ व्या नगरसेविकेने मात्र शिंदे गटाऐवजी शिवसेनेतच राहणे पसंत केले. तर नवी मुंबई महापालिकेतीलही ३०-३२ नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती हाती येत आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगरसेवकांनी भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.

ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल बुधवारी, ६ जून २०२२ रात्री उशिरा नंदनवन या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सद्य स्थितीत ६७ नगरसेवक आहेत. टेंभी नाक्याचे शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हे अमरनाथ यात्रेसाठी गेल्याने ते नव्हते, तर घोडबंदर येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याने तेही यावेळी उपस्थित नव्हते. उर्वरित ६४ नगरसेवक यावेळी हजर होते. तर एक नगरसेविका सोबत नव्हत्या. त्या नगरसेविका दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून शिवसेनेचे लोकसभेतील नव्याने नियुक्त करण्यात आलेले प्रतोद राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कालच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आले. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून त्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. ही गळती सुरु असतानाच आता ठाण्यानंतर नवी मुंबईतील जवळपास ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतील ३० ते ३२ नगरसेवक एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक आगामी काळात शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. नवी मुंबईत शिवसेनेचे एकूण ५० नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईमध्येही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *