Breaking News

उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, अजित दादा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केलेला पण…. पहाटेच्या शपथविधीवरून काढला चिमटा

पावसाळी अधिवेशात विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर काल आणि आज चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून चांगलाच चिमटा काढत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या टोप्या उडविल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी थेट पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला. तसेच त्यावेळी अजित पवारांनी घाई केली, असा खोचक टोला लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे आशिर्वाद आहेत आणि आनंद दिघेंवर आमची श्रद्धा आहे.

तुमचं वागणं, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? मी झोपतोच पहाटे चार वाजता. तुमच्याबद्दल मला आदरही आहे, आम्ही श्रद्ध सबुरीनेच काम करतो आहे. तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली. तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता असे ते म्हणाले.

जयंत पाटील यावर हसत आहेत. मला आठवतंय, जयंत पाटील म्हणाले म्हणाले होते की, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यामुळे अजित पवारांनी थोडी घाई केली.

पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे. तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. मी त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत, अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मला वाटलं जयंत पाटीलदेखील तेथे आहेत. मात्र, जयंत पाटील तेथे नव्हते. ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता आणि ओके झाला असता असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीच आलेलं नाही. ते खरं आहे, कुणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. शेवटी हे लोकांच्या हातात असतं. काही लोकं म्हणाली आम्ही २५ वर्षे सत्तेत राहणार आहे. २५ वर्षे कोण टिकतो, कोण कुठे जातो, आत राहतो, बाहेर जातो कुठे जातो कोण सांगू शकेल? आम्ही पुढील अडीच वर्षे चांगलं काम करू आणि त्यापुढील पाच वर्षे इकडेच राहू. आम्ही पुढील १०, १५, ५० वर्षांचं काहीही सांगणार नाही असे सांगत शिवसेनेला टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले पुन्हा येईल, पुन्हा येईल. ते पुन्हा आले, पण मलाही सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघे दोघे आहोत. आधी फडणवीस एकटे सगळ्या विरोधी पक्षांना पुरून उरायचे. आता आम्ही दोघे आहोत. ‘एक से भले दो’. मनात दुसरं काही आणू नका, हे विधायक कामासाठी आम्ही दोघे असं म्हणत आहे त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही कोपरखळी लगावत म्हणाले, यापूर्वी राज्यात डान्स बार सुरु होते. त्यावेळी तुम्ही बघायला जात होता ना त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, असे काही सभागृहात सांगत जावू नका. त्यावर शिंदे म्हणाले, मी चांगलेच सांगतोय नको सांगू का मग असे म्हणत आव्हाड यांची फिरकी घेतली.

तसेच आव्हाड यांना माहित आहे आपण एकदा शब्द दिला की शब्द पाळतो. त्यामुळे आपण काम करणार माणूस आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जयंत पाटील खरं सांगा तुम्हाला विरोधी पक्षनेता व्हायचं होत की नाही. पण अजित पवार झाले असे सांगत जयंत पाटील यांचीही टोपी उडविण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *