Breaking News

एकनाथ शिंदे म्हणाले; असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणे कधीही चांगले… पोलिसांना १५ लाखात घर, ७५ हजार जागांसाठी भरती

विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. तसेच फार मुख्यमंत्री राहणार नसल्याचे भाकितही विरोधकांकडून करण्यात आले.

या टीकेचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणे कधीही चांगले. मी राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतलेले आहे. सर्व सामान्य नागरीकांच्यासमोर असलेल्या अडचणी सोडविण्याचे कंत्राट घेतलेले आहे. आम्ही या अडीच वर्षात इतके काम करू की पुढील पाच वर्षे आम्ही इकडच्या बाकावरच राहु असा टोला शिवसेनेसह विरोधकांना लगावला.

हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत. त्यामुळे त्यांचे आशिर्वाद आमच्या सोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच सांगितले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपली दुश्मन आहे. या दोन्ही पक्षांसोबत काम करण्याची माझ्यावर वेळ आली तर मी माझे दुकान अर्थात शिवसेना बंद करेन असे म्हणाले होते. त्यामुळे मी आता इकडे आलो आहे. त्यांच्या विचारांशी ज्याने प्रतारणा केली. ते तिकडे राहीले असेही ते म्हणाले.

पण तुम्ही मनावर घेऊ नका ते वाक्य बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. माझे नाही असे सांगत मी तर तुमच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे माझे असे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर काल शिंदे समर्थक गटाच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या आमदारांशी केलेल्या धक्काबुक्कीवर बोलताना ते म्हणाले, तिथे काल झालेला प्रकार हा पोरा-टोरांचा होता. त्यात हे अनिल पाटील कशाला गेले. बर अजून एक तो वरच्या सभागृहाचा अमोल मिटकरी यांने कारण नसताना घोषणाबाजी सुरु केल्याने हा प्रकार झाल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

पोलिसांना १५ लाखात घर आणि ७५ हजार पदांकरीता नोकर भरती  

मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मोठ्या घोषणा करत राज्यातील पोलिस दल आणि बेरोजगार तरूणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना ५० लाख रूपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्ही तो २५ लाख रूपयांमध्ये देण्याचा विचार केला. परंतु २५ लाख रूपये हे ही जास्त होत असल्याने आम्ही शेवटी पोलिसांना १५ लाख रूपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला असून शासकिय नोकऱ्यांमधील ७५ हजार रक्त पदांसाठी नोकर भरती करणार असल्याची घोषणा केली.

हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. काम करणारे सरकार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसमोर असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *