Breaking News

संजय राऊत म्हणाले, घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये हृदयनाथ मंगेशकर यांच्या विषयीच्या किस्स्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वीर सावरकर यांचे गाणे रेडिओ आकाशवाणीवरून प्रस्तुत केले म्हणून त्यावेळच्या काँग्रेस सरकारने त्यांना आकाशवाणीच्या रेडिओवरून काढून टाकल्याचा दावा केला होता.

या दाव्याचा संदर्भ देत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले की, मी काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. तिथे वीर सावरकरांचे गाणं गायल्याबद्दल ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमवावी लागली असे सांगण्यात आले. मला कळायला लागल्यापासून मी ते ‘सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकले. हे गाणं लोकप्रिय कऱण्याचं काम आकाशवाणीनेच केले. माणसाने किती खोटं बोलावे असे सूचक वक्तव्य करत किमान घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये. पण मी त्यांना वंदन करतो असा उपरोधिक टोला पंतप्रधान मोदी यांना लगावला.

नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी वरील टोला लगावला.

माझ्या माहितीनुसार असं कुठेही रेकॉर्डमध्ये नाही. मी ऑल इंडिया रेडीओचे प्रमुख महेश केळुसकर यांचं निवेदन ऐकले. त्यांनाही आश्चर्य वाटले आहे. जर एखादे गाणे निर्माण केल्याबद्दल, गायल्याबद्दल एखाद्या संगीतकाराला काढलं असेल तर ते गाणं आकाशवाणीवर लावतील का? आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच हृदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवले. आमची सावकरांवर भक्ती आहे. पण आमची नौटंकी नसल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी भाजपावर केली.

मंगेशकर कुटुंबिय हे मुळचे गोव्याचे आहेत. त्यातच गोवा विधानसभा निवडणुकीची धामधुम सध्या सुरु आहे. त्यामुळे हा उल्लेख झाला असावा का असे संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, ते महान पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी कोणी झालं नाही आणि नंतर होणार नाही असं दिसत आहे. मी त्यांचा आदर करतो. ते मोठे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी काही फार बोलायचं नाही असे सांगत पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली.

मोदी नेमके काय म्हणाले?

लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होते, असा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जेव्हा ते सावरकरांना भेटले तेव्हा कवितेला चाल लावण्याबद्दल सांगितलं होतं. त्यावर सावरकरांनी हृदयनाथ यांना माझी कविता सादर करुन जेलमध्ये जायचंय का? अशी विचारणा केली होती. यानंतर हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीतबद्ध केले. त्यानंतर आठ दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत असे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *