Breaking News

उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच मुंबई महापालिकेने अद्याप परवनागी न दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाने मुंबई महापालिककडे रितसर अर्ज केला. मात्र त्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी शिवाजी पार्कवर आमचाच दसरा मेळावा होणार असल्याचे जाहिर करत उध्दव ठाकरे यांनी हिंदूत्ववादी विचार सोडले असल्याने तो अधिकार आमचाच असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाला दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता शिवाजी पार्क शिवतीर्थावरच आमचा दसरा मेळावा होणारच अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

त्यामुळे मुंबई महापालिकेने अद्याप या मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नसल्याने शिवसैनिकांमध्ये प्रथेप्रमाणे दसरा मेळावा कुठे होणार याबाबत संभ्रामवस्था आहे.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, दसरा मेळावा कुणाचा होणार यावरुन कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी तो खुशाल करावा. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार व्यक्त केला.
ठाकरे यांनी सोमवारी दसरा मेळाव्याबाबतच्या अनिश्चिततेला पूर्णविराम देत पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरु केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक मांत्रिक भाग आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करून परवानगी मागितली आहे. मात्र, महापालिकेने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे यांनी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा निर्वाळा दिला.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगरे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने टारफे यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

साधारणतः पक्षप्रवेशासाठी सत्ताधारी पक्षाकडे रांग लागते, पण आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळे चित्र दिसत आहे . गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून भाजपाने जी आवई उठवली होती, त्या आवईला छेद देणारे आज पक्षप्रवेश झालेत. एक वेगळे चित्र महाराष्ट्रात निर्माण होत आहेत. हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे यांनी हिंदुत्ववादी आणि मुस्लिम कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत खोट्या आणि भ्रामक हिंदुत्वाच्या नावाखाली आपली फसवणूक झाली, असे ज्यांना वाटते आणि खरे हिंदुत्व शिवसेनेचे आहे असं ज्यांना वाटते त्यांच्यासाठी शिवसेनेचे तसेच मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी आपण आमच्या साथीला यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *