Breaking News

संजय राऊत यांनी केली ईडी कारवाई, फडणवीस आणि सोमय्यांची पोलखोल मी वेळ मागितली की देवेंद्र फडणवीस पळून जातात

पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलखोल सभा आज घेतली. या सभेत बोलताना संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच हे सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांना झालेल्या अटकेबद्दल वक्तव्य केलं. त्यांना झालेल्या अटकेचं कारण राऊत यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मला तुरुंगात का टाकलं होतं हे तुम्हाला माहितीय का? मी काही केलं नव्हतं म्हणून मला तुरुंगात टाकलं. खरंतर मी माझ्या एका भावाकडून ५० लाख रुपये घरासाठी घेतले होते. ते मी परत केले. पण त्यामुळे ईडीचे लोक आले. यांचं सरकार बनत असताना हे सगळं घडलं. कारण त्यांना माहिती होतं हा माणूस सरकारविरोधात अडथळा ठरेल. मग ते लोक मला घेऊन गेले.
खासदार राऊत म्हणाले की, ते लोक मला घेऊन जात असताना मी त्यांच्या पाया पडलो नाही. मी त्यांना म्हटलं नाही की, मला घेऊन जाऊ नका, मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो, मला सोडा, मला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये टाका, मला स्वच्छ करा, मला पवित्र करा असलं काही मी बोललो नाही. उलट मी म्हटलं चला घेऊन. परंतु तुरुंगाची भिंत मला अडवू शकली नाही.

राहुल कूल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे सादर करण्यासाठी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महिन्यापासून वेळ मागतोय, पण ते वेळ द्यायला तयार नाहीत. मी येतो म्हटलं की ते पळून जातात, असं विधान राऊतांनी केलं.

यावेळी राऊत म्हणाले, हे बेकायदेशीर आणि बोगस राज्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मी गृहमंत्र्यांकडे वेळ मागत आहे. माझं सरकारकडे कोणतंही वैयक्तिक काम नाही. मी गेली ४०-४२ वर्षे राजकारणात आहे. २२-२३ वर्षांपासून मी खासदार आहे. मी कोणत्याही वैयक्तिक कामासाठी मंत्रालयात जात नाही. पण मी दोन कामांसाठी फडणवीसांकडे वेळ मागितली. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना भंगारात जातोय. शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. तुमचे लाडके चेअरमन राहुल कूल यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून ठेवला आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्यांनी अगदी लहान-लहान गोष्टींत पैसे खाल्ले आहेत.

पैसे खायची पण एक प्रतिष्ठा असते. राजकारणात सन्मानाने पैसे खायचे असतात, तेही तुम्हाला जमत नाही. याचा खुलासा करण्यासाठी मी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे वेळ मागतोय. मला राज्याच्या हिताची माहिती द्यायची आहे. पण ते माझ्यापासून दूर पळून जातायत. मी येतो म्हटलं की ते पळून जातात. तुम्ही कुणाला वाचवत आहात? भ्रष्टाचाऱ्याला पाठिशी घालत आहात का? शेवटी मी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. आता सीबीआय काय करतंय बघू… मग मी ईडीकडे तक्रार दाखल करेन. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाईन. २०२४ ला आपलं सरकार येणारच आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे आपलं सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोण वाचवतं, तेच मी पाहतो…तुम्हाला ५०० कोटी पचू देणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी राहुल कूल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

राहुल कूल यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार केला, तरीही त्यांच्यावर सरकारकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाते, असा आरोपही राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, संजय राऊत, अनिल परब आणि तिकडे दिल्लीत मनीष सिसोदिया हे सर्व नेते फक्त विरोधी पक्षाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता शिवसेनेतून जे ४० आमदार तिकडे गेले आहेत. त्यातील १२ जण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. प्रत्येकावर ईडी आणि सीबीआयचा खटला दाखल आहे.

प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाकडून गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांना भाजपाने आपल्यात घेतलं, वॉशिंग मशीनमध्ये टाकलं, धुतलं आणि स्वच्छ केलं. आता त्यांच्या खटल्याचं काय झालं रे किरीट सोमय्या… आता काय झालं? पुढच्या वेळी इकडे येताना मी किरीट सोमय्यांना बरोबर आणणार आहे. तो नाही आला तर कॉलर पकडून घेऊन येईन… जरा यह भी भ्रष्टाचार देखो, ५०० करोड का… मिस्टर कूल आप मिस्टर कूल हो, तो मै भी मिस्टर हॉट हू… आपको छोडुंगा नही, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *