Breaking News

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन राजीनामा देईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार

कथित मनी लॉडरींग आरोपावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्यावरील आरोप सिध्द होईपर्यत त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असे धोरण महाविकास आघाडीने स्विकारत तसे जाहीरही केले. त्यावर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीवरून भाजपाने आज राज्याभर आंदोलन केले. तसेच राजीनामा घेईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा भाजपाच्यावतीने आज देण्यात आला.

दादर येथील वसंत स्मृतीबाहेर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले त्यावेळी हा इशारा देण्यात आला.

दाऊद इब्राहिम या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने अटक केलेल्या नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले. नवाब मलिक यांनी राजीनामा देईपर्यंत भाजपाचे आंदोलन चालू राहील असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

प्रदेशाध्यक्षांसोबत भाजपा नेते आ. प्रसाद लाड, माजी खासदार किरीट सोमय्या व आ. कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्यासह अनेक कार्यकर्ते निदर्शनात सहभागी झाले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, दाऊद हा देशाचा दुश्मन आहे व त्याच्याशी संबंध असणाराही देशाचा दुश्मन असल्याचे मान्य करा. नवाब मलिक यांना आता मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नाही. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ठाकरे सरकारमध्ये गुन्ह्यांमध्ये गुंतलेले अनेक मंत्री आहेत. इतक्या भ्रष्ट आणि गुन्हे करणाऱ्या मंत्र्यांना घेऊन ठाकरे सरकार चालविणार का ? असा प्रश्न आहे. आता या सरकारलाच सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.

भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने मारले आहेत. या सरकारने अनेकदा घटनेचे उल्लंघन केले आहे. त्याचे सविस्तर निवेदन भाजपा राज्यपालांना सादर करेल. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे टाळता येणार नाही असे सामान्य माणसालाही वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *