Breaking News

नाणार प्रश्नी राणेंची शिवसेनेला साथ राजदंड पळविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नी क्रेडिट घेण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. अखेर याची परिणीती काँग्रेसच्या नितेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांना साथ देत राजदंड पळविल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नाणार प्रश्नी जवळपास चारवेळा तहकूब झाल्यानंतर पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज सुरु झाले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार आक्रमक होत याप्रश्नी चर्चा करण्याची मागणी करू लागले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच शिवसेनेचे राजन साळवी, प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे नितेश राणे यांनी राजदंड पळविण्यासाठी पुढाकार घेतला. शिवसेने आधी राणे यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शिवसेनेच्या आमदारांनीही राजदंडाला हातात घेत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे चोपदार यांनी या चार जणांच्या हातातून राजदंड काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ते खाली पडले.

अखेर या गोंधळातच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.

या गोंधळातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनियोजन विधेयक सभागृहात मांडत ते गोंधळातच मंजूर करून घेतले. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सहकार्य केले.

दरम्यान, राजदंड पळविण्याचा प्रयत्न सुरु असतानाच अध्यक्ष बागडे यांनी विनियोजन विधेयक मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यामुळे राजदंड नसताना विधेयक मंजूर करणे कितपत कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे असा सवाल विरोधकांकडून खाजगीत उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *