Breaking News

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहिरनामा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहिरनामा तयार करण्यात आलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा आहे. त्यामध्ये सार्वजनिक सेवा… पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आलेला आहे असेही स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही जाहिरनामा समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी हा जाहिरनामा केलेला आहे. पक्षासाठी एक चांगला जाहिरनामा तयार केला त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांचे अजित पवार यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, या जाहिरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी पाठपुरावा करणार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, शेतकऱ्यांना एमएसबी मिळावी, अपारंपरिक वीज निर्मिती, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिगच्या संकटाला थांबवायचे असेल तर अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा, ही ठळक वैशिष्ट्ये सांगितली.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री सांगतानाच त्यानुसार आम्ही काम करणार आहोत असे सांगत यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. मोदींच्या नेतृत्वाखाली आपला मोठा विजय निश्चित आहे. त्यांना तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊन मते मागत आहोत. एनडीएचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेचजण त्यांच्याकडे बघत आहेत असे सांगतानाच विरोधी पक्षात असा एकही चेहरा बघायला मिळणार नाही जो मोदींसोबत स्पर्धा करु शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल असा जोरदार टीकाही यावेळी विरोधकांवर केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, विदर्भात मतदान टक्केवारीने कमी झाले आहे त्याला प्रचंड उष्णता होती हे नैसर्गिक संकट होते. यापुढे असे होऊ नये असा प्रयत्न करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे असे आवाहनही केले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही महायुतीसोबत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. ही बाब तितकीच महत्वाची आहे. अलीकडच्या काळात राजकीय भूमिका, राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता, फारुख अब्दुल्ला यांच्या भूमिका पाहिल्या तर तुम्हाला जाणवेल असेही आवर्जून सांगत सबका साथ.. सबका विकास सबका प्रयास.. सबका विश्वास.. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची श्रध्दा आहे. याच भूमिकेतून राष्ट्राचा विकास… राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्री आधारीत आजची लोकसभा महत्वाची आहे. त्यासाठी आमच्या जाहिरनाम्यात आम्ही काही गोष्टी विषद केलेल्या आहेत असेही स्पष्ट केले.

लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. उन्हाची तीव्रता आहे हवामान बदलत आहे. शेतकऱ्यांचे गारपिटीने नुकसान होत आहे. यामध्ये निवडणूकीची आचारसंहिता न आणता याबाबत संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

आज जाहिरनामाचे प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने झाल्याचे अजित पवार यांनी जाहिर यावेळी केले.

आम्ही महायुती करुन या लोकसभेला सामोरे जात आहोत. या देशात एनडीएच्या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. सगळे विक्रम मोडून भाजप आणि मित्र पक्ष अब की बार ४०० पार हा नारा देऊन सामोरे जात आहोत असे खासदार प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ पासून कार्यरत आहे. या पक्षाचे संस्थापक म्हणून छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल पटेल हेसुद्धा होते असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

बॅरिस्टर अंतुले यांना कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे खुर्चीवरून खाली उतरवण्याचे काम झाले होते. आमचे ७१ आमदार असताना आम्हाला मुख्यमंत्री पद मिळू नये असे काम कॉंग्रेसने केल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली आहे असे सांगतानाच आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात पक्षाचे विचार आणि तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे वाचन केले पाहिजे. तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

मी या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे असे सांगतानाच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्याच मार्गाने हा पक्ष जाणार असून आमचा मार्ग कायम तोच राहणार आहे. गोरगरिबांसाठी आम्ही काम करणार आहोत… आदिवासी, दलित, ओबीसींसाठी यांच्यासह सगळ्यांसाठी काम करणार आहोत. स्वातंत्र्याची फळं सर्वांना चाखायला मिळाली पाहिजे. कुठलाही समाज मागे रहाता कामा नये. राज्यातील अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. विकास करत असताना सामान्य माणूस समोर असला पाहिजे हे लक्षात घेऊनच काम केले पाहिजे. हेच विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे असे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *