Breaking News

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करते का? भाजपा प्रदेशाध्यक्ष ‌चंद्रकांत पाटील यांचा सवाल

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपा‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

तसेच शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. ते‌ पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे माध्यमांशी बोलत होते.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयानेही नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे एकप्रकारे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पाठिशी घालण्याचाच प्रकार आहे असल्याची टीका त्यांनी केली.

घटनात्मक दृष्ट्या एखाद्या सरकारी नोकरदाराला अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचे निलंबन करायचे असते. तसेच चार्टशीट दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करावे लागते. त्यानुसार मंत्र्याच्या अटकेनंतर ही प्रक्रिया का राबवली जात नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मंत्रालयाच्या आवारात किंवा आसपासच्या परिसरात मराठा समाजबांधवांना,ओबीसी राजकिय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करु इच्छिणाऱ्यांना आंदोलनास परवानगी नाही. पण दुसरीकडे नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. त्यामुळे या आंदोलनास कोणी परवानगी दिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेला सवाल करताना ‌पाटील म्हणाले की, “संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेनं तातडीने घेतला. पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.”

शिवसेनेच्या सावरकर प्रेमावर विचारले असता ते म्हणाले की, “महाविकास आघाडीसोबत सत्तेत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊच शकत नाही. कारण तिघांनी एकत्रित येऊन ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरवला आहे, त्यानुसार एकमेकांच्या निष्ठांना धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केली; तर त्यांना चालतं. पण सावरकरांमुळे शिवसेना सोडून इतर दोन पक्षांच्या निष्ठा, मन दुखावणार असेल, तर सावरकर प्रेम जाहीर करायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सोयीनुसार शिवसेना सावरकर प्रेम व्यक्त करत असते,” असा टोलाही यावेळी लगावला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *