Breaking News

छगन भुजबळ यांची मागणी, .. नोकऱ्यांमधील आमचा अनुशेष अगोदर भरा

एकीकडे ओबीसी समाजातून जातींना काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय तर दुसरीकडे ओबीसीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिंदे समिती कडून खोटे कुणबी दाखले देण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजातील बांधवांच राजकीय आरक्षण सुध्दा धोक्यात येईल. अगदी सरपंच सुद्धा कुणी होऊ शकणार नाही. ओबीसींना आरक्षणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी ओबीसी म्हणून एकत्र या आणि ओबीसी सर्व एक आहे हे दाखवून द्या असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज ठाण्यातील आगरी महोत्सव मैदान येथे ओबीसी निर्धार महामेळावा पार पडला. त्यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ.बबनराव तायवाडे, मुस्लिम ओबीसी महासंघाचे शब्बीर अन्सारी,प्रा.टी.पी.मुंडे,प्रा.राजाराम साळवी,आ. किसन कथोरे, आ.रईस शेख,आ.महेश चौघुले, शांताराम मोरे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, सुरेश तावरे,योगेश म्हात्रे ,पांडुरंग भरोरा, जी.डी.तांडेल, दशरथ पाटील, रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, यशवंत सोरे यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते आणि ओबीसी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आगरी कोळी समाजाचे कुणबी समाजाचे उपकार आपल्यावर आहे. शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या ज्योतिबा फुले यांना १८८९ मध्ये मांडवी-कोळीवाडा येथे ‘महात्मा’ ही पदवी देणारे आगरी-कोळीच होते. भारतातला सर्वात मोठा शेतकरी संप १९३२ ते १९३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळकायदा निर्माण करणारे आगरी-कोळी लोकच होते. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी-कोळी लोकच होते. स्वातंत्र्यानंतर लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली सिडकोच्या अन्यायी भूसंपादनाविरोधात जासई येथे पाच हुतात्मे देऊन संपूर्ण भारतात कुठेही लागू नसलेली साडेबारा टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणारी पुनर्वसन योजना साकार करणारे आगरी-कोळी लोकच असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या आंदोलनात ॲड.जनार्दन पाटील साहेबांचं मोठ योगदान होत त्यांची आज आठवण येत आहे. आमचा विरोध मराठा समाजाला नाही. आमदारांची घर जाळणाऱ्यांना आमचा विरोध आहे. आमचा विरोध दादागिरीला, झुंडशाहिला आहे, राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांना आमचा विरोध आहे. आमची लायकी नाही असं म्हणणाऱ्यानी लक्षात घ्यावं की आमची ओबीसीची मुलं तुमच्या पेक्षा अधिक हुशार आहेत. त्यामुळे आमची लायकी काढणारा तू कोण असा सवाल मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेता केला.

छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हल्ला करणारे हे नेमकी कोण आहेत असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मावळ्यांचा इतिहास म्हणून लिहिला जातो. ते मावळे आम्ही आहोत. त्यांच्या सैन्यात अठरा पगड समाजातील मावळे होते. कुठल्या एका जातीचे नाही असे नमूद करत म्हणाले, आम्हाला गाव बंदी केली गेली. परंतु काही नेत्यांना मात्र गावबंदी नाही. तरी राज्यात अशांतता निर्माण आम्ही करतोय असं म्हटल जातय. प्रत्यक्षात मात्र आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जाताय तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. शासन किती त्याच्या पाया पडणार, किती डोक्यावर चढवणार, सरकार किती झुकणार ही लोकशाही आहे की, लोकशाहीची थट्टा आहे अशी टीकाही मनोज जरांगे यांचे नाव घेता केली.

ओबीसींना २७ टक्के आरक्षण असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप पर्यंत ९ टक्के देखील नोकऱ्यांमध्ये संधी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने पहिल्यांदा नोकऱ्यांमधील ओबीसींचा अनुशेष भरावा अशी मागणी करत छगन भुजबळ म्हणाले, मराठा नेत्यांनी जरांगेची भेट घेऊन ते हे का नाही सांगत की, ओबीसी आरक्षणातून वाटा मागणे चूक आहे, जाळपोळ करणे चूक आहे, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यांसोबत संबंध ठेवणे चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणे चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गावबंदी करणे चूक आहे, एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद जाहीर करून इतर सर्व लोकांना वेठीस धरणे चूक आहे, अमुक अमुक तरखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी धरून शासनाला धमकी देणे चूक आहे, सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसींच्या ताटातले आरक्षण मागणे बेकायदेशीर आणि चूक आहे असेही ठणकावून सांगितले.

मनोज जरांगेच्या पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले, माझा कार्यक्रम करू असे म्हणणाऱ्या जरांगेनी पहिले अरे तू तुझी तब्येत सांभाळ, माझा कार्यक्रम करील त्याला मी अजिबात घाबरत नाही. मात्र जे ओबीसींच्या विरोधात बोलताय त्यांचा येणाऱ्या निवडणुकीत कार्यक्रम केल्याशिवाय राहू नका, माझी वाट न बघता ठीक ठिकाणी सभा सुरू ठेवा. ओबीसीला जागे करा आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढाईची तयारी करा असे आवाहनही यावेळी केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *