Breaking News

अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, तुटपुंजी रक्कम देऊन सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आक्रमक

अतिवृष्टी,संततधार आदींमुळे त्रस्त शेतकरी मदतीकडे आस लावून बसला असताना पीकविम्याची तुटपुंजी रक्कम देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर हल्लाबोल केला.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यवतमाळच्या आझाद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा काढण्यात आला, यात जवळपास २ हजार शेतकरी व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.

या मोर्चाला संबोधित करताना दानवे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाची आणि केलेल्या चुकीच्या कामांची माहिती जनतेसमोर मांडली. यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण अधिक असून ही बाब लाजिरवाणी आहे. झोपलेले हे सरकार यावर कोणतेही ठोस पाऊले उचलतांना दिसत नाही. सरकारची कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नसून त्यांच्या हक्काचं विमा देखील हे सरकार कंपन्यांना देऊ देत नाही. शेतकऱ्यांच अख्खं पीक वाया गेलं तरी त्यांच्या पदरात ५० आणि १०० रुपये विमा देऊन हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा उडवत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला.

२०१७ साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या १ लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी. नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरित मिळावे. २०१८ पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना त्वरित चालू करावी. विहिरी दुरुस्तीसाठी खचलेल्या, बुजलेल्या विहिरीसाठी अनुदान मिळावे आदी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर समस्यां वर प्रकाश टाकत सरकारची कानउघडणी केली.

एकीकडे मोठया कंपन्यांच्या फायद्यासाठी वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा डाव आखत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जात आहे. वीज जोडणी कापल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचेही दानवे म्हणाले.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवला जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असता, कापूस केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यात येतील व इतर समस्यांबाबत माहिती घेऊन पावले उचलली जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

या आक्रोश मोर्च्यात पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खा. अरविंद सावंत, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख प्रमोद सोनावणे, माजी मंत्री संजय देशमुख, मा. आ. श्रीकांत मुनगिनवार, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, महंत सूनीलजी महाराज, कल्पानाताई दरवाई, निर्मला विनकरे, योगिता मोहड यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिलाआघाडीचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांचा समावेश होता.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *