Breaking News

अजोय मेहता राज्याचे नवे गृह सचिव ?

मुख्य सचिव जैन यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळणार

मुंबईः प्रतिनिधी

राज्यातील विविध विभागांचे प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार असून अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर राज्याचे मुख्य सचिव डि.के.जैन यांना तीन ते चार महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागांच्या प्रधान सचिव पदी असलेल्या बहुतांष अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यातच मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून विविध निर्णयांची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत कृषी विभाग, गृह विभाग, महिला व बाल कल्याण विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. त्यामुळे ही पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नगरविकास २ च्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी करण्याची शक्यता आहे. तर विद्यमान आयुक्त अजोय मेहता यांना गृह विभागाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजयकुमार यांचीही बदली होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
राज्याचे मुख्य सचिव डी.के.जैन यांना लोकसभा निवडणूका होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असून त्यानंतर वित्त विभागाचे प्रमुख यु.पी.एस. मदान यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *