Breaking News

अजित पवारांनी सुनावले, ठरावात त्या पाच शहरांचा उल्लेख नाही, व्याकरणात चुका… बेळगाव, कारवार, निपाणीसह असा उल्लेख ठरावात करावा ;ठरावातील चूक अजित पवारांनी आणली निदर्शनास...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला. मात्र त्या ठरावामध्ये बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख का केला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या पाच शहरांसह सर्व गावांचा उल्लेख ठरावात करावा असे सांगत ठरावात असलेली चूक विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिली.

दुपारी लक्षवेधी सूचनेच्या कामकाजानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या विरोधात असलेला ठराव मांडण्यात येणार असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहिर केले. तत्पूर्वी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने तयार केलेल्या ठरावातील त्रुटी आणि व्याकरणातील चुका दाखवून दिल्या.

तसेच या ठरावात व्याकरण चुका असून चुकीच्या पद्धतीने ठराव मांडला जाऊ नये यासाठी तो व्यवस्थित दुरुस्त करून सभागृहात मांडावा अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

कर्नाटकविरोधात मांडल्या जाणाऱ्या ठरावातील वाक्यरचनेवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप नोंदवला. आम्हालाही हा ठराव कोणतीही त्रुटी न राहता एकमताने मंजूर करायचा आहे असं सांगत अजित पवारांनी सर्व गटप्रमुखांना थोडं बोलू देण्याची विनंती केली.
अजित पवारांच्या आक्षेपावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ठराव एकमताने मंजूर करायचा होता याची आठवण करुन दिली. लक्षवेधीचा मुद्दा मांडत असताना रोखल्याने सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं आहे का? अशी विचारणा अजित पवारांनी केली. यावर फडणवीसांनी संसदीय कामकाज मंत्र्यांचं अजित पवार कधीपासून ऐकू लागले याचं मला आश्चर्य वाटतं असा खोचक टोला लगावला.

या ठरावावर चर्चा करायची नाही, एकमताने मंजूर करायचं असं ठरवलं होतं. कारण चर्चेत राजकीय अभिनिवेश येतो. मग तिथून आलं तर इथून उत्तर येईल. त्यामुळे या ठरावावर कोणी बोलू नये, तो एकमताने मंजूर करुयात असं ठरलं होतं. यातून आपल्याला सर्वजण एक आहोत असा संदेश द्यायचा आहे. तुम्ही दिलेल्या सूचनांची नक्की अंलमबजावणी करु, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

यानंतर अजित पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. पण कालच्या चर्चेत आपण ठराव नजरेखालून घालावा इतकंच सांगणं होतं. आमचं फार काही म्हणणं नाही.

ठरावावर सर्वांचं एकमत आहे. पण हा विषय महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषिकांचा आहे. कर्नाटक सरकारकडून आक्रमकपणे महाराष्ट्राविरोधात विधानं केली जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवरुन आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले जात आहेत. त्यामुळे सदस्यांना आपल्या भावना व्यक्त करु देण्यात काही गैर नाही, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली.

महत्त्वाचा ठराव राज्याच्यावतीने मुख्यमंत्री मांडतात. सर्व राज्याचं लक्ष असून मराठी भाषिकांना यातून दिलासा मिळाला पाहिजे. अख्खा महाराष्ट्र पाठीशी आहे हे त्यांना कळलं पाहिजे. पण हा ठराव मराठी भाषेसंदर्भातही महत्त्वाचा आहे. नीट वाचल्यास त्यात मराठीचे अनेक चुकीचे शब्द वापरण्यात आले आहेत. व्याकरण, शब्दरचना यातही चुका आहेत. ठराव मंजूर केल्यानंतर तो जशाच्या तसा केंद्राकडे पाठवतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कर्नाटक सरकार हा ठराव घेऊन न्यायालयातही जाऊ शकतं. या ठरावामागे महाराष्ट्राच्या भावना आहेत. त्यामुळे ठराव योग्यप्रकारेच केला पाहिजे. अशाप्रकारे मराठीची दुर्देशा करणारा ठराव मांडून सरकार संपूर्ण महाराष्ट्र आणि सीमाभागातील नागरिकांची, भाषेची काही थट्टा करत आहे का असं वाटत आहे. योग्य पद्धतीने ठराव दुरुस्त करुनच तो मंजूर करायला हवा, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळी ठराव दाखवला त्याचवेळी व्याकरणाच्या चुका आहेत सांगायचं होतं. त्या आपण सुधारुच. पण व्याकरणाच्या चुकांनी कायदेशीर अडचण येत नाही, भावना महत्त्वाच्या आहेत असं सांगत आश्वास्त करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *