Breaking News

राज ठाकरे म्हणाले, शहरे ही महापालिका नव्हे तर बांधकाम व्यावसायिक चालवितात लवकर निवडणूका होणे गरजेचे

नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातून आवाज उठविला जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकर होणे आवश्यक असल्याचे सांगत सध्या ज्या सुविधा महापालिकेकडून नागरिकांना देणे गरजेचे आहे, त्या सुविधा बांधकाम व्यावसायिक पैसे घेऊन नागरिकांना देत आहेत. त्यामुळे शहरे महापालिका नाही तर बांधकाम व्यावसायिक चालवित असल्याची मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आज ठाणे येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतीत काहीच निश्चित दिसत नाही. त्या कधी होतील, याबाबत विविध चर्चा ऐकायला येतात. पण नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच समस्या सोडवल्या जातात. ते जर सभागृहात नसतील तर नागरिकांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार ? असा प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या निवडणूका या लवकरात लवकर व्हाव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.

बहुसदस्य पध्द्तीने निवडणुका घेणे ही काही राजकीय पक्षांची सोय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजपा यांनी या पध्द्तीने निवडणूका का घेण्याचे ठरवले हा प्रश्नच आहे. यापूर्वी एकसदस्य पद्धतीने निवडणुका होत नव्हत्या का? असा प्रश्न ही त्यांनी विचारला. बहुसदस्य पध्द्तीत एकाच पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच एकमत नसते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या कशा सुटतील अशी विचारणाही यावेळी त्यांनी उपस्थित केली.

शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी देखील त्यांनी मत व्यक्त केले. एका व्यक्तीकडे किती वाहने हवीत यालाही मर्यादा हव्यात. आपल्या देशात नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडूण त्याची सवय लावून घेतली तरच मेट्रो सारखे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील असेही ते म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाशी संबंधित त्यांचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना आठवणींचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ठाण्यात क्रिकेट सामना पाहण्यासाठी राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हा सामना असल्याने त्यांनी रात्री ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आराम करायचे ठरवले. परंतु उन्हामुळे गाद्या तापल्या होत्या. अखेर कुलरचे पाणी अंगावर ओतून झोपावे लागले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *