Breaking News

ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता “राज्य क्रीडा दिन” सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री संजय बनसोडे म्हणाले, भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, यासाठी त्यांचा जन्मदिवस, १५ जानेवारी हा राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून प्रतीवर्षी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास पूर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी ५० हजार तर क्रीडा सप्ताहासाठी १ लाख रुपये असे एकूण २ लाख २५ हजार सुधारित अनुदान देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

तसेच पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिन साजरा करण्यासाठी भरीव अनुदान उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

राज्य क्रीडा दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

क्रीडा व युवक सेवा संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी स्व. खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन राज्य क्रीडा दिनानिमित्त करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा मंत्री बनसोडे यांनी केले आहे.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *