Breaking News

आता शाळांमध्ये डब्‍बेवाल्‍यांचे डबे? पोलीस आयुक्‍त आणि शिक्षण उपसंचालकांनी तातडीने संयुक्‍त बैठक घेण्याचे मुख्‍यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी
मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली असली तरी डबेवाल्‍यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्‍यांचे महत्‍व लक्षात घेता ही बंदी अयोग्‍य असून मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्‍यांनी मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने याबाबत संयुक्‍त बैठक घ्‍यावी असे निर्देश दिले. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही याबाबत तातडीने लक्ष घालण्‍याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले.
एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. विद्यार्थ्यांना डबे पुरवण्यास शाळांनी मनाई केली आहे, असा आरोप मुंबई डबेवाले संघटनेचे नेते सुभाष तळेकर आणि मेडगे यांनी केला. त्‍याबाबतच्‍या बातम्‍या आज प्रसिध्‍द झाल्‍या आहेत. त्‍याची दखल घेत मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज तातडीने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून व पत्र लिहून त्‍यांचे लक्ष वेधले.
“मुंबईतील डबेवाले हे त्‍यांच्‍या व्‍यवस्‍थापन कौशल्‍यासाठी जगप्रसिध्‍द असून १९८० पासून मुंबईतील डबेवाले सुमारे रोज २ लाख जणांना डबे पोहचविण्‍याचे काम ३६५ दिवस अत्‍यंत मेहनतीने करीत असतात. ही सेवा हे डबेवाले अत्‍यंत प्रामाणिकपणे करीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांना शाळेत डबे देण्‍यास बंदी घालणे ही बाब अन्‍यायकारक आहे. शाळांनी मुलांच्‍या सुरक्षेची काळजी जरूर घ्‍यावी, मात्र शाळांमध्‍ये अन्‍य सेवा देणा-यांना ज्‍या पध्‍दतीने परवानगी देण्‍यात येते त्‍याच पध्‍दतीने डबेवाल्‍यांची सेवाही सुरू ठेवण्‍यात यावी”, अशी मागणी करीत आमदार शेलार यांनी मुख्‍यंमंत्री फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री तावडे यांना आज प्रत्‍यक्ष भेटून तसेच पत्र लिहून ही बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आणून दिली.
त्यावर मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने शाळा, डबेवाले यांच्‍याशी संयुक्‍त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा असे निर्देश या शेलार यांच्या पत्रावर मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही शिक्षण उपसंचालकांनी याबाबत तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *