Breaking News

अग्निसुरक्षेसाठी काळबादेवीतील सुवर्ण कारागिरांचे व्यवसाय स्थलांतरीत करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काळबादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर जून्या व मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे या परिसरातील सुवर्णकार कारागिरांचे उद्योग स्थलांतरीत करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंदर्भात मुंबई महापालिकेने बैठक घेऊन कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी भागात राहणारे हरकिशन गोरडीया यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा उद्योग अन्यत्र स्थलांतर करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या.

आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे सामान्यांच्या कामांना गती द्यावी. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक पातळीवरच निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

काळबादेवी भागातील प्रत्येक घरात सुवर्णकार कारागिरांचा व्यवसाय प्रमाणावर आहे. तेथे भट्ट्या, धुराच्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत असून व्यवसायासाठी भट्ट्यांचा वापर होत असल्याने अग्निसुरक्षेची  काळजी पुरेशा प्रमाणात घेतली जात नसल्याची तक्रार गोरडीया यांनी केली होती.

त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांच्या अग्निसुरक्षेच्या कारणावरुन मुंबादेवी, काळबादेवी परिसरातील हा व्यवसाय मुंबई परिसरातच स्थलांतर करावा. या व्यवसायिकांना तीन महिन्याची नोटीस द्यावी. मुंबई महापालिकेने या संदर्भात बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे आदेश दिले.

यासंदर्भात मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जैन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुंबई शहरात सोने-चांदीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. जवळपास ४० हजार सोन्याच्या कारागिरांचे व्यवसाय आहेत. त्यामुळे या परिसरातच कारागिरांचे व्यवसाय असणे आवश्यक आहे. जर कारगिरांचा व्यवसाय मुंबईबाहेर हलविल्यास त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होणार असल्याचे मत व्यक्त केले.

 

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *