Breaking News

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा, गती वाढली तर शेवटचा पर्याय… राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर टोपे यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील मुंबई, पुणे नंतर आता सातारा, उस्मानाबाद आणि नागपूरात ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यानंतर या विषाणूच्या गतीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. जर ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती वाढून जर तिसरी लाट आली आणि ऑक्सीजनची आवश्यकता ८०० मेट्रीक टनावर पोहोचल्यास राज्यात लॉकडाऊन लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला.

राज्यात काल मध्यरात्रीपासून जमाव बंदीचे लागू करत लग्न, जाहीर कार्यक्रमांसाठी नागरीकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आल्या. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावेळी सांगितले.

याची गती अशीच वाढत गेली तर तिसरी लाट तर ती ओमायक्रॉनची असेल. जर ओमायक्रॉनची गती आणखी वाढत गेली ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊनबाबत विचार करत आहोत. ज्या दिवशी ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लावावा लागणार. पण कदाचित संसर्गाची गती इतकी असेल तर ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता कदाचित ५०० वर आणावी लागेल अशी परिस्थिती सुद्धा येऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्बंधांचा उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे.

देशात काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली असली तरी राज्यात मात्र रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र बाहेर पडता येणार नाही वा एकत्र जमता येणार नाही.

दरम्यान, आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे. आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही. इथून पुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य भरतीतील परीक्षांबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत पोलीस तपास अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *