Breaking News

शौर्य आणि बलिदानाची नेत्रदीपक कहाणी ऐतिहासिकतेचा परिपूर्ण अनुभव

चित्रपट परिक्षण: संजय घावरे

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा म्हणजे सिनेरसिकांसाठी भव्य आणि दिव्यतेची जणू मेजवानीच असते. राजपूत आणि करणी सेनेने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे चित्रीकरणापासून प्रदर्शनार्पंत कायम चर्चेत राहिलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट म्हणजे भन्साळींचं त्याच वाटेवरील आणखी एक भव्य-दिव्य पाऊल आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एखाद्या सुरेख चित्रासारखी दिसेल अशी सजवण्याची कला भन्साळींना चांगलीच अवगत आहे. या चित्रपटातही भन्साळींचं हे कसब पाहायला मिळतं. वरवर पाहता विरोध व्हावा असं या चित्रपटात काही आहे असं वाटत नाही. याउलट भन्साळींनी राजपूतांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठीच हा चित्रपट बनवला असावा असा असं चित्रपट पाहताना वाटत राहतं.

चित्रपटाची कथा आहे एका अतिशय सुंदर दिसणाऱ्या सिंहल राजकुमारी पद्मावतीची. चितोडचे राजे रावल रतन सिंह अचानक पद्मावतीच्या जीवनात येतात आणि तिचं संपूर्ण जीवनच पालटून जातं. पद्मावतीच्या बाणांनी रक्तबंबाळ झालेले रावल रतन सिंह तिच्या सौंदर्याने अधिक घायाळ होतात. त्यातच ते तिला लग्नाची मागणी घालतात. दोघांचा विवाह होतो आणि पद्मावती मेवाडची राणी बनते. एकीकडे सणकी, मातलेला, उन्माद, वासनांध अलाउद्दीन खिलजी दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी स्वत:च्या काकाची विश्वासघाताने हत्या करतो, तर दुसरीकडे पद्मावती आणि रावल रतन सिंह यांना एकांतात लपून पाहण्याच्या आरोपाखाली तडीपार करण्यात आलेला चितोडचा राजगुरू राघव चेतन सूडापोटी अलाउद्दीनशी हातमिळवणी करतो. चितोडची राणी पद्मावती अतिशय सुंदर असून तिच्यावर तुझाच हक्क असायला हवं असं सांगत राघव अलाउद्दीनला चिथावतो. त्यामुळे अलाउद्दीन चितोडवर आक्रमण करण्यासाठी सज्ज होतो. त्यानंतर जे घडतं ते राजपूतांच्या पराक्रमांची आणि त्यांच्या पत्नींनी केलेल्या बलिदानाची नेत्रदीपक कहाणी कथन करतं.

चित्रपटाच्या माध्यमातून राजपूतांच्या शौर्याची गाथा सादर करताना मनोरंजक मूल्यांचा कितपत वापर करण्यात आला आहे आणि इतिहासाशी कितपत छेडछाड करण्यात आली आहे ते चित्रपट पाहून सांगणं कठीण आहे. एक मात्र खरं आहे की भन्साळींनी जे दाखवलं आहे ते अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. उदाहरणच द्यायचं झालं तरी भन्साळींनी ‘बाहुबली’च्या तोडीस तोड देईल अशी कलाकृती तयार केली आहे. पद्मावती आणि रावल रतन सिंह यांच्यातील गुलाबी क्षण टिपताना ते अश्लिलतेकडे झुकणार नाहीत याची योग्य काळजी घेण्यात आली आहे. पद्मावतीचं सौंदर्य खुलविण्यात पोषाख आणि दागिन्यांचा मोलाचा वाटा आहे. पद्मावतीला सुंदर दाखवण्यासाठी जितकी मेहनत घ्यावी लागली नसेल त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त मेहनत व्याभिचारी आणि विलासी वृत्तीच्या सणकी अलाउद्दीनच्या सादरीकरणासाठी घेण्यात आल्याचं चित्रपट पाहताना प्राकर्षाने जाणवत राहतं. कॅास्च्युमपासून अॅटिट्युडपर्यंत अलाउद्दीनची व्यक्तिरेखा शक्य तितकी अॅरोगंट कशी होईल त्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. याच कारणामुळे हा चित्रपट जरी पद्मावतीवर आधारित असला तरी अलाउद्दीन खिलजीला कांकणभर जास्तच फुटेज मिळालं आहे.

संवादलेखन ही देखील या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखांखेरीज इतर कॅरेक्टर्सच्या मुखातील संवादही अर्थपूर्ण आणि हृदयाला भिडणारे आहेत. ‘घुमर…’ हे गाणं आज रसिकांच्या ओठांवर चांगलंच रुळलं असून पडद्यावर पाहतानाही त्यातील सौंदर्य अधिक खुलून येतं. या जोडीला एका गाण्यातील अफगाणी आणि तुर्की संगीताचा मिलाफ सुरेख असला तरी हे गाणं नसतं तर कदाचित चित्रपटाची लांबी कमी झाली असती. कारण चित्रपटाचा पूर्वार्ध बराच लांबला आहे. राजस्थानी लोकसंगीताला देण्यात आलेला बॅालिवूड टच श्रवणीय वाटतो. कॅमेरावर्क, स्पेशल इफेक्ट्स, कला दिग्दर्शन, संकलन आणि सादरीकरणातही ‘पद्मावत’च्या टिमने बाजी मारली आहे.

या चित्रपटातील शीर्षक भूमिका जरी दीपिका पदुकोणने साकारली असली तरी रणवीर सिंह ही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. दीपिकाने सुंदर दिसण्यासोबतच डोळ्यांच्या माध्यमातून केलेला अभिनय हृदयाला भिडतो. नखशिखांत सजलेल्या दीपिकाचं राजपूतानी सौंदर्य नेत्रसुखद आहे. अलाउद्दीन खिलजी या नकारात्मक भूमिकेतही रणवीर सिंहने आपल्या हटके अभिनयाच्या बळावर जीव ओतला आहे. संवाद फेकीपासून ते देहबोलीपर्यंत सर्वच पातळीवर या चित्रपटात एक वेगळाच रणवीर पाहायला मिळतो. शाहिद कपूरने रावल रतन सिंह या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला असला तरी तो त्या भूमिकेत शोभत नाही हे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतरही जाणवत राहतं. याचं प्रमुख कारण रणवीरचा अभिनय आहे. रणच्या मैदानात दोघेही जेव्हा दंद्व युद्ध करण्यासाठी आमने सामने येतात तेव्हा धिप्पाड रणवीरसमोर शाहिद काही अंशी कमकुवत वाटतो. ही या चित्रपटाची सर्वात मोठी उणीव मानावी लागेल. त्याऐवजी रणवीरच्याच उंचीचा एखादा भारदस्त अभिनेता असता तर चित्र खूप वेगळं दिसलं असतं. गफूरच्या भूमिकेत जिम सर्भ, मेहरुन्निसाच्या भूमिकेत आदिती राव हैदरी आणि जलालुद्दीनच्या भूमिकेत रझा मुराद लक्षात राहतात.

रसिकांना आवडेल असं या चित्रपटात सारं काही आहे. स्थानिक लोक संगीतापासून बॅालिवूड टच असलेलं संगीत, फॅन्टसी, युद्ध, राजकीव डावपेच, स्पेशल इफेक्ट्स, रोमांस यांच्या आधारे सादर केलेली राजपूतांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या पत्नींच्या बलिदानाची कथा पडद्यावर पाहताना संस्मरणीय वाटते. या चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी खरोखर छेडछाड करण्यात आली आहे का? हा वादाचा मुद्दा आहे. मन मोहून टाकणारी एक सुंदर कलाकृती असं ‘पद्मावत’चं वर्णन करता येईल.

 

॰॰कसा आहे? : अधिक चांगला॰॰

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *