Breaking News

राज्याला पोलिओमुक्त करण्यासाठी ८५ हजार बुथची उभारणी २८ जानेवारीला विशेष मोहिम राबविणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातून पोलिओ आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ८५ हजार बुथची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी २८ जानेवारी  व ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली.

या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात ८५ हजार बुथ उभारण्यात येणार असून पालकांनी येत्या रविवारी पोलिओ बुथ बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, आज राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. लसीकरण मोहिमेसाठी नियोजन व संबंधित विभागांनी करावयाची कार्यवाही बाबत आरोग्य विभागाचे प्रभारी सचिव संजय देशमुख यांनी आढावा घेतला. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीवकुमार यावेळी उपस्थित होते.

१९९५ पासून पोलिओ निर्मुलन विशेष मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यात दोन वेळा विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविली जाते. पोलिओचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहिम सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावर्षी रविवार २८ जानेवारीला ही मोहीम घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस सुमारे २ कोटी ९० लाख ९० हजार घरांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना डोस पाजण्यात येणार आहे.

यावर्षी एक कोटी २१ लाख २९ हजार ३५० बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या विशेष मोहिमेत १०२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत एक कोटी २३ लाख ५१ हजार ४६४ बालकांना डोस पाजण्यात आला. तर एप्रिलमध्ये ९८ टक्के मुलांना डोस देण्यात आला होता.

रविवारी होणाऱ्या या मोहीमेकरीता आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण, महिला व बालविकास, परिवहन, नगरविकास, ग्रामविकास, ऊर्जा विभाग, रेल्वे, रोटरी क्लब यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सादरीकरण केले. बैठकीस टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

Check Also

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *