Breaking News

जीएंच्या लक्ष्मी कथेवरील विद्यार्थी-निर्मित लघुपटाला दोन पुरस्कार स्मिता तांबे लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेत; आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड

मुंबई: प्रतिनिधी

वरळी येथील एल एस रहेजा टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या, प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णी यांच्या लक्ष्मी कथेवर आधारित लक्ष्मी या लघुपटाला चिपळूण येथील केएफटीआय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. विविधांगी भूमिकांनी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणार्‍या स्मिता तांबे यांना या लघुपटात साकारलेल्या लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. लघुपटाचे दिग्दर्शक शशांक म्हसवडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.

चिपळूण येथे २४ मार्च २०१९ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. केएफटीआय महोत्सवात आलेल्या असंख्य लघुपटांतून एकूण १५ लघुपट अंतिम फेरीत निवडले गेले होते. लक्ष्मी लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याची ऑफिशियल सिलेक्शन यादीत निवड झाली आहे. यात प्रतिष्ठेच्या लंडन इंटरनॅशनल मोशन पिक्चर्स अवॉर्डस (LIMPA) या इंग्लंडमधील आणि पेनसील्वेनिया राज्यातील ग्रेट लेक्स इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवल (GLIFF) या अमेरिकेतील महोत्सवांचा समावेश आहे.

अतिशय गरीब कुटुंबातील नाकर्त्या नवर्‍याची दुसरी पत्नी असणार्‍या, स्वकष्टाने घर चालवणार्‍या आणि गरिबीतून बाहेर पडण्यासाठी एका अघोरी उपायाचा अवलंब करणार्‍या, पोटच्या मुलांचे प्रेम न मिळूनही आत्मसन्मानाशी कुठलीही तडजोड न करणार्‍या, आणि गरिबीविरूद्धचा लढा जिंकूनही शेवटी कफल्लकच राहिलेल्या लक्ष्मीची, जीएंनी लिहिलेली ही विलक्षण कथा आहे. या लघुपटाचे छायाचित्रण कोकणातील संगमेश्वर येथे पार पडले.

जोशी की कांबळे तसेच एक अलबेला या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. पटकथा लेखन आणि दिग्दर्शन शशांक म्हसवडे यांचे असून जयकुमार चत्तर सहदिग्दर्शक आहेत. अक्षय राणे यांचे छायाचित्रण आणि आकाश पाटील यांचे संकलन आहे. आशुतोष घुरूप आणि विक्रांत पवार यांनी निर्मिती व्यवस्थापन सांभाळले आहे. हे सर्व जण संस्थेच्या डिजिटल फिल्ममेकिंग विभागाचे सन २०१७ – १८ च्या बॅचचे विद्यार्थी आहेत.  एल एस रहेजा संस्थेचे प्राचार्य प्रकाश पेठे, शेखर सरतांडेल, सुनील सातवळेकर, राजदत्त रेवणकर, सुजीत गोरे, कुणाल देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *