Breaking News

६५व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांची मोहोर अमित मसुरकरच्या न्युटन ला राष्ट्रीय तर प्रादेशिकमध्ये ‘कच्चा लिंबू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

नवी दिल्ली : प्रतिनिधी

मराठमोळा अमित मसुरकर दिग्दर्शित आणि राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तर प्रादेशिक चित्रपटांमध्ये प्रसाद ओकने प्रथमच स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा आणि विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून अमर भारत देवकरचा ‘म्होरक्या’, सुयश शिंदेचा ‘मयत’ या लघुपटाला, नागराज मंजुळेचा ‘पावसाचा निबंध’, राजेंद्र जंगलेचा ‘चंदेरीनामा’ आणि निपुण धर्माधिकारी यांच्या ‘ठप्पा’ आदी चित्रपट आणि लघुपटांना विविध विभागातील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा प्रसिध्द दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केली. विषेश म्हणजे आज जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक पुरस्कार विजेत्यांमध्ये मराठी कलावंताच्या आणि मराठी भाषिक चित्रपटांची संख्या जास्त असल्याने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मराठीची मोहोर उमटवली गेल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

तर दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे. ‘व्हिलेज रॅाकस्टार’ या आसामी सिनेमाचा गौरव सुवर्णकमळ देऊन करण्यात येणार आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॅाम’ सिनेमातील शीर्षक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. यासोबतच संगीतकार ए. आर. रेहमान यांना ‘मॅाम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचाही पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘भयानकम’ या सिनेमासाठी जयराज यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ‘नागरकीर्तन’ या सिनेमासाठी रिधी सेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘इरादा’मधील भूमिकेसाठी दिव्या दत्ताला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, फहाद फाजिल यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, ‘टॅायलेट – एक प्रेमकथा’ या सिनेमातील ‘गोरी तू लाथ मार…’ या गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच ‘बाहुबलीः द कन्क्लूजन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस या पुरस्कारासोबत अब्बास अली मोगल यांना सर्वोत्कृष्ट साहस दृश्ये पुरस्कार तसंच सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा असे तीन पुरस्कार घोषित झाले आहेत. पंकज त्रिपाठी यांना ‘न्यूटन’साठी विशेष उल्लेखनीय चित्रपट, ‘मृत्यूभोग’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – येसुदास, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – साशा त्रुपाती, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – भानिता दास (व्हिलेज रॉकस्टार), सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट – इरादा, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट – आलोरुक्कम असे इतर मुख्य विभागातील पुरस्कार जाहिर झाले आहेत.

मराठी चित्रपट विभागांमध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित तसंच रवी जाधव व सोनाली कुलकर्णी अभिनीत ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा बहुमान मिळवला आहे. पेशाने डॅाक्टर असणाऱ्या सुयश शिंदे यांच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात येईल. लघुपटांसाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी नागराज मंजुळेने आपल्या नावे केला आहे. यासोबतच ‘पावसाचा निबंध’च्या ध्वनीमुद्रणासाठी अविनाश सोनावणे यांना सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणाचा पुरस्कार घोषित झाला आहे. यशराज कऱ्हाडे यांचा ‘म्होरक्या’ विशेष उल्लेखनीय चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचाही पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राजेंद्र जंगले यांचा ‘चंदेरीनामा’ सर्वोत्कृष्ट प्रमोशनल सिनेमा बनला आहे. राष्ट्रीय एकात्मता नर्गिस दत्त पुरस्कार निपुण धर्माधिकारी यांच्या ‘ठप्पा’ला देण्यात येईल.

याखेरीज इतर पुरस्कारांमध्ये सर्वोत्‍कृष्‍ट बंगाली चित्रपट – मयुराक्षी, सर्वोत्‍कृष्‍ट कन्नड चित्रपट – एबेतु रमाका, सर्वोत्‍कृष्‍ट मल्‍याळम चित्रपट – थोडीमुथ्थलम द्रिक्षशियम, सर्वोत्‍कृष्‍ट तेलगु चित्रपट – गाजी, स्पेशल मेन्शन (विशेष दखल फीचर फिल्म) – हॅल्लो अर्सी (उडिया) – प्रकृती मिश्रा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण – पिया शाह (वॉटर बेबी), सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट – नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग, सर्वोत्‍कृष्‍ट चित्रपट समीक्षक – गिरधर झा, सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती – गिरीजादेवी डॉक्युमेंट्रीसाठी दिले जाणारे इतर राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ३ मे २०१८ रोजी विजेत्यांना एका दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

One comment

  1. मराठी चित्रपट आशयप्रधान असल्याने गुणात्मक दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. परंतु मराठी प्रेक्षक आणि प्रेक्षागृह या दोन्हीची वाणवा आहे… त्याचं काय? मागील ५ वर्षातील मराठी चित्रपट निर्मितीची संख्या याप्रमाणे आहे.
    वर्ष / मराठी चित्रपटांची संख्या
    २०१३ – ११६
    २०१४ – १३२
    २०१५ – १६५
    २०१६ – १२१
    २०१७ – ३७
    २०१७ मध्ये चित्रपट निर्मिती कमी का झाली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *