Breaking News

रुपयाची मजबूती सरकारसाठी आव्हानात्मक निर्यातीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी

मंगळवारी दिवसाचे कामकाज सुरु होताच डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी वाढून डॉलरचा दर ६३ रूपये ५० पैशांवर पोहचला. अडीच वर्षातील रूपयाचा हा उच्चांकी भाव आहे. वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीत रुपया मजबूत राहण्याची आशा असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. तसेच अर्थसंकल्पा पर्य़ंत रुपया ६२ रूपये ८० पैशापर्यत येण्याची शक्यता आहे. रुपयातील ही मजबूती काही क्षेत्रांसाठी सकारात्मक आहे. मात्र, सरकारसाठी रुपयाची मजबूती आव्हानात्मक ठरू शकणार असल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..

निर्यात, नोकऱ्यांवर परिणाम

रुपया मजबूत होणे ही महागाईच्या दृष्टीकोनातून सकारात्मक बाब आहे. याबरोबरच आयातही स्वस्त होईल. मात्र, निर्यातीच्या पातळीवर रुपया वधारणे नकारात्मक ठरते. डॉलरच्या तुलनेत रुपया वाढल्याने निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न घटते. देशातून होणाऱ्या निर्यातीचे पैसे डॉलरमध्ये मिळतात. रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव कमी झाल्याने निर्यातीपासून मिळणारा लाभ कमी होतो. याचा परिणाम देशातील कंपन्यांच्या नफ्यावर होवून त्याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. तर रुपयातील मजबूती ही नवीन नोकऱ्यांच्या बाबतीतही सरकारपुढे आव्हानात्मक ठरू शकते.

या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम

रुपया सातत्याने मजबूत होत असल्याने निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगांचे नुकसान होणार आहे. यामध्ये आयटी आणि औषध क्षेत्रांचा समावेश आहे. धातू, उर्जा आणि वाहन क्षेत्राच्या नफ्यावरही याचा परिणाम होईल. याशिवाय सोने, आभूषणे, मत्सोत्पादन, कापड आणि चमडा उद्योगावरही याचा नकारात्मक परिणाम दिसून येईल.

वर्ष २०१७ च्या सुरूवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया ६८ रूपये ०६ पैसे या पातळीवर होता. आता तो ७ टक्के मजबूत होऊन ६३ रूपये ५० पैशावर पोहचला आहे. याअगोदर जून २०१५ मध्ये रुपयाचा दर जवळपास असाच होता. रुपया आणखी मजबूत झाल्यास रिझर्व्ह बँक डॉलरची खरेदी करून दोन्ही चलनांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *