Breaking News

आंबेडकरी चळवळीचे तीन तेरा ? दलित- आदीवासी नव्या राजकिय पर्यायाच्या शोधात

मुंबई : संजय बोपेगांवकर

दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर देशातील दलित, आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सुरु केलेला लढा पुढे नेणे गरजेचे होते. मात्र गेल्या ५० ते ६० वर्षात विशेषत: महाराष्ट्रात या चळवळीचे नेमके काय झाले? याची चर्चा करणे सद्यपरिस्थितीत करणे बनणे क्रमप्राप्त बनले आहे.

यातील विशेषत: कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर दलित पँथर या संघटनेचा जन्म झाला. मात्र ती चळवळ नंतर हेवेदावे आणि वैयक्तिक राजकिय महत्वकांक्षा यातून लयास गेली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व दलित नेत्यांच्या ऐक्याच्या राजकिय पक्षाचा जन्म झाला. त्यातून अनेक नेते उद्यास आले. मात्र त्यांना सर्व दलित, आदीवासी आणि शोषितांचे होता आले नाही. त्यातच प्रत्येक नेत्याला आपली राजकिय आणि संघटनात्मक मर्यादा कळली नसल्याने या राजकिय पक्षाचेही अनेक गट आणि विभागनिहाय तुकडे पडल्याचे चित्र सर्वांसमोर दिसत आहे.

साधारणत: देशभरात १८ टक्केहून अधिक स्वरूपात असलेला दलित, आदीवासी समाजाला कोणीही राजकिय नेतृत्व देवू शकले नाही. त्यामुळे हा दोन्ही समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखलेल्या शत्रु विचारधारेच्या राजकिय पक्षाच्या छत्रछायेखाली चालला आहे. त्यास रोखण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे सद्याचा दलित समाज एका नव्या राजकिय पर्यायाच्या शोधात असल्याचे दिसून येत असून या अनुषंगाने प्राधिनिक स्वरूपात दोन बोलक्या प्रतिक्रिया खाली देत आहोत..

एखादी संघटना नव्याने उभी रहात असेल तर दलित राजकारणातील काही प्रस्तापित नेत्यांचे बगलबच्चे आमच्या नेत्याशिवाय कोणी मोठा होता कामा नये यादृष्टीने त्या संघटनेत फोडाफोडीचे राजकारण करतात. नविन कार्यकर्ते निर्माण होऊ द्यायचे नाहीत. काही लोक चळवळीत फक्त पदासाठी नावासाठी येतात. तर काही लोक पदासाठी काम करतात ते लोक प्रामाणिक कार्यकर्त्याना पुढेच येऊ देत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्यावर जातीय दृष्ट्या अन्याय झाला किंवा तो जायबंदी झाला हत्या झाली तर हेच पुढारलेले नेते भावनिक आंदोलन उभे करतात. मोर्चा, आंदोलन केल्यानंतर काही दिवस उलटताच सगळे शांत होते. हेच नेते सांत्वन करतात आणि तिथं तडजोड करतात. स्थानिक पातळीवरील प्रस्तापित राजकीय पुढारी, आमदार, खासदार यांच्या गाठीभेटी घेवून आंदोलनाची धार बोथट करत वातावरण शांत करतात. यापध्दतीच्या राजकारणाला लोक कंटाळून गेल्याने आंबेडकरी चळवळीचे तिन तेरा वाजले आहेत. (दादाभाऊ अभंग, लेखक समीक्षक व्याख्याता)

दलित समाजातील वातावरण अस्वस्थ असून याला कारण आपल्या नेत्यांचा लालसेपणा आहे. ” भाकरी पेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या ” असे बाबासाहेब म्हणाले होते. पण चळवळीतील नेत्यांनी सत्तेच्या लालसेपोटी स्वाभिमान गहाण टाकला आहे. याविषयीची प्रचंड मोठी चिड समाजात आहे. जे कार्यकर्ते आपल्या नेत्याला नेता मानतात, तेच कार्यकर्ते एखाद्या नाक्यावर कट्ट्यावर बसुन साहेबांचं आपल्याला पटत नाही अशी चर्चा करत केवळ पर्याय नसल्याने आपण काम करतोय असं सांगतात. मुंबईत आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले आहेत. पण या किल्यात आंबेडकरी चळवळीचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकत नाही. तो नेता म्हणतो मी जिकडे जातो समाज तिकडे येतो, असे म्हणणाऱ्या नेत्याचा एकही माणूस का निवडूण येवू शकत नाही ? याचा अर्थ स्पष्ट असून अशा नेत्यांच्या सोबत समाज नाही.

राज्यातील प्रस्तापित राजकारण्यांना आंबेडकरी चळवळीला सोबत घेतल्याशिवाय सत्तेत येता येत नाही हे उघड सत्य आहे. परंतु प्रत्येक नेता वैयक्तिक लाभासाठी समाजात फूट पाडून क्षणिक सुखाचा लाभ घेताना दिसतात. पण तो नेता आणि त्यांचे बगलबच्चे समाजाचं प्रचंड नुकसान करीत आहेत. (तानाजी कांबळे, विद्रोही कार्यकर्ता)

Check Also

गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक

युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *