Breaking News

कोकण, पश्चिम घाट माथ्यावरील भात शेतीच्या नुकसानीचा आढावा घ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कोकणातील तसेच पुणे,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात अतिवृष्टी, पुरामुळे भातशेतीचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कटले असल्याने राज्य शासनाने या भागातील भातशेतीची पाहणी करून आवश्यकतेनुसार तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात भांडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठविले आहे.

भांडारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, २६ ते ३० जुलै या पाच दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. त्या पाच दिवसांमध्ये मी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात असल्याने तेथे अतिवृष्टी व अन्य कारणामुळे भातशेतीच्या झालेल्या स्थितीबाबत राज्य शासनाचे काही गोष्टींकडे लक्ष वेधणे आवश्यक बनले आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्यामुळे कोकण व पश्चिम घाटमाथ्यावर भातपेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे लावण्याही लांबणीवर गेल्या. गेल्या आठवड्यात लावण्यांना गती मिळाली होती.याच काळात अतिवृष्टी झाल्यामुळे लावण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तयार केलेली भात रोपे मोठ्या प्रमाणावर वाया गेली आहेत. पुरामुळे अनेक शेतात पुराबरोबर वाहून आलेला गाळ भरला आहे तर अनेक ठिकाणी दरडी घसरून शेती मातीखाली गेली असल्याने भातशेतीचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कटलेले आहे. आता भाताचे-तांदळाचे पीक कोकणातील शेतकऱ्याच्या हाती येण्याची शक्यता फार कमी आहे.

रायगड, ठाणे जिल्ह्यात तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील तांदूळ उत्पादक भागातही अशीच परिस्थिती आहे. शासनाने कोकण व घाटमाथ्यावरील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल तातडीने घ्यावी. त्यासाठी संपूर्ण कोकण, कोल्हापूर ते पुणे घाटमाथा ह्या भागातील भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणारा आढावा घेण्याबाबत घ्यावा व त्याच्या आधारे आवश्यकता असेल त्याप्रमाणे कोकण,पश्चिम घाटमाथ्यावरील तांदूळ उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देणारी पावले उचलावीत,असेही भांडारी यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *