Breaking News

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांना सांगितले.

संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. तर त्यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत बोलायला हवे होते. पाटकर कोण ?, राऊत कोण ?, तुमच्या मुलीची व्यावसायिक भागिदारी आहे की नाही ?, ज्यांना कोविड सेंटरची कामे मिळाली ते कोण ?, त्यात भागिदारी आहे का ? याबद्दल संजय राऊत यांनी बोलायला हवे होते. पण त्याऐवजी त्यांनी खूप दिवसांपूर्वी बाहेर आलेला मुख्यमंत्र्यांचा १९ बंगल्यांचा विषय पुन्हा काढून तो विषय पटलावर आणला. तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांचा विषय पुढे आणला. संजय राऊत यांनी बंगल्यांचा विषय काढण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचा हेतू संशयास्पद आहे. त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का ?, असा प्रश्न निर्माण होतो असेही ते म्हणाले.

ज्या आयटी विभागाला पाच वर्षांची तरतूद ३८० कोटींची होती, त्या विभागात पंचवीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा राऊत यांनी केला. एकूणच सर्व संशयास्पद होते व कोणता विषय का काढला जात आहे हे समजत नव्हते असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात. कोणाच्या ते सर्वांना माहिती आहे. त्या इशाऱ्यानुसार राऊत मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा इशारा करणाऱ्यांना आपला मुख्यमंत्री करायचा आहे का, त्यांना संजय राऊत यांना मुख्यमंत्री करायचे आहे का, असे प्रश्न संजय राऊत यांनी अचानक मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीच्या संपत्तीचा विषय पुढे आणल्याने निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा हे खूप हुषार राजकारणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ध्यानात येत नाही की, हे सर्वेसर्वा कठपुतळीच्या खेळाप्रमाणे आपल्याला खेळवत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे सुडाचे राजकारण चालू आहे. क्रिया प्रतिक्रिया चालू आहे. त्यांना जे करायचे ते त्यांनी करावे मग आम्हीही आम्हाला जे करायचे ते करू असा इशाराही दिला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *