Breaking News

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, सावित्रीबाईंनी प्लेग, दुष्काळात काम केले पण आताचे… विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण

मराठी ई-बातम्या टीम

सावित्रीबाईंनी प्लेग आणि दुष्काळ या संकटात काम केल्याची आठवण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगत मात्र, आज पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही, असे वास्तव दाखविणारे वक्तव्य केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावकरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सुनेत्रा पवार, विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एस.एन. उमराणी आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांनी समाजात बदल घडविण्यासाठी शाळा सुरू केली. त्या दरम्यान अनेकांनी विरोध केला, हल्ला केला. तरी देखील त्यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवले. त्यामुळे आज समाजात अनेक बदल घडलेला दिसत आहे. सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळ आणि प्लेगच्या साथीत खूप मोठं योगदान दिले आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या प्लेगच्या साथीने तेव्हा देशभरात थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी नागरिकांना सेवा देण्याचे काम केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पण आता आपण ज्या करोना आजाराचा सामना करीत आहोत, त्यामध्ये एखाद्या पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा आणि मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही. हे आपण पाहिल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीमध्ये नागरिकांची सेवा करीत मृत्यू झाला आणि आज आपण काय पाहतोय असा उपरोधिक सवाल उपस्थित करत आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जाण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे विविध क्षेत्रात महिला पुढे जाताना दिसत आहेत. त्यातील मुख्य क्षेत्र म्हणजे क्रिडा क्षेत्रात मुलांपेक्षा सर्वाधिक जास्त पदके मुली मिळवत आहेत. पदके जिंकणाऱ्यांमध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय समाजातील मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचा आवर्जून उल्लेख करत या गोष्टींचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जात असून आज मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे. हा क्षण कधीच विसरणार नाही. हा पुतळा विद्यापीठामध्ये येणार्‍या प्रत्येकाला कायम प्रेरणा देणारा ठरेल असेही ते म्हणाले.

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *