Breaking News

नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी

अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच असेही ते म्हणाले.

नवाब मलिक यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की अटक केलेल्या आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवायचे का, न्यायालयीन कोठडीत म्हणजे तुरुंगात पाठवायचे का किंवा जामीन द्यायचा याचा निवाडा न्यायालय करत आहे. त्या निमित्ताने तपासकामाची पडताळणी न्यायालयात होत आहे. नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे आणि आपले म्हणणे मांडावे. पण ते प्रत्यक्ष न्यायालयात न जाता केवळ मीडिया ट्रायलमधून तपासकामाबद्दल संशय निर्माण करत आहेत. ते विनाकारण भारतीय जनता पार्टीला यामध्ये ओढत आहेत. असे करून त्यांच्या मनाचे समाधान होईल पण आरोपींची सुटका होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *