Breaking News

उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा, बजरंग बली की जय, मग कुठे गेली तुमची ५६ इंच छाती? काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज बारसू येथील आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, सध्या कर्नाटकातील निवडणूक प्रचारा दरम्यान पंतप्रधान मोदी सगळ्यांना बजरंग बली की जय अशी घोषणा द्यायला सांगत आहेत. मग हेच का तुमचे बळ असा उपरोधिक सवाल करत मग कुठे गेली तुमची ५६ इंचाची छाती असा खोचक टोलाही लगावला.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही. एक समाधान आहे, माझ्यावर आरोप केल्याने भाकरी मिळते हेही नसे थोडकं, आज जगताप कुटुंब आपल्यासोबत आले आहेत. मी सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. मी असं म्हणत होतो की, मातोश्रीत प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि महाडमध्ये सभा घेऊ. पण ऐकतील ते जगताप कुटुंबिय कसले? त्यांनी हट्टच धरला. इथेच या ऐतिहासिक मैदानात सभा घेणार म्हणून इथे आलो

स्नेहल ताई आणि जगताप कुटुंबिय काँग्रेसमधून आल्या. काही जणांच्या भुवया उंचावल्या. काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला. तसं आपण काही करत नाही आहोत. आपण त्यांना काहीही न देता ते आपल्याकडे आले आहेत असेही सांगितले.

तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, मला नेहमी आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं, सत्तेकडे सगळे जातात. आज तर माझ्याकडे सत्ता नाहीय. आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं आणि स्वत: तिकडे बसले. ज्यांनी त्यांना फूस लावली, म्हणजे भाजपाने, जाऊ दे शब्द कमी पडतील. कारण मी मध्ये बोललो होतो त्याने वाद झाला होता. भाजपाने एवढा नीच डाव केला की आपलं चिन्ह आणि धनुष्यबाण चोरलं आणि ते त्यांच्या खोक्यावर मारलं. मी आज केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी माझ्याकडे काहीच नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढे प्रचंड संख्येने आलेले आहात, जगताप कुटुंबिय आले आहेत, अद्वैत हिरे आले. आणखी काही जण येणार आहेत. पण असं आश्चर्य याआधी पाहिलं नव्हतं असेही म्हणाले.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, महाड मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तो केवळ निवडणुकीपुरता नाही. मी कागदावर लिहून ठेवलं आहे की एकही मतदारसंघ सुटता कामा नये. फटाके सुद्धा शिवसैनिकासारखे एकदा पेटले तर ऐकत नाहीत. म्हणून कोणी शिवसैनिकाला पेटवायचा प्रयत्न करु नये. कारण मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजण्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही शिंदे गटाला दिला.
तळीया गावात दरड कोसळली. किती जणांना घरे मिळाली? दोन वर्ष झाली. माझ्याकडे नावं आहेत. तळीया गावात ७१ घरं स्थलांतरीत झाली, त्यातील ६६ नष्ट झाली. जेवढी घरं द्यायची होती त्यापैकी फक्त १५ घरं तयार आहेत असे सांगत स्थानिक प्रशासनाने ही माहिती तपासावी आणि तत्कालीन सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आवाहनही केली.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी महाडमधील सभेतून पहिल्यांदाच पोलिसांना उद्देशून मोठं विधान केले. निवडणुका येतील जातील. पण २०२४ साली आपण ही वृत्ती गाडली नाही तर लोकशाही संपेल. तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा. तुम्ही मोदींचे नाव घेवून या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. काहीतरी स्वीकारा. पोलीसांना पण सांगतो सरकार येईल. जाईल. हे सरकार हलायला लागलंय. कायद्याचा वापर करा, पण गैरवापर करु नका. मी माझी पातळी सोडली नाही. मला तशी गरज नाही, असेही सांगितले.

काहीही हातात नसतांना जमलेले आशीर्वाद माझ्यासाठी खूप आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी कसा होतो हे जगजाहीर. मला लिहिण्याची, सांगण्याची गरज नाही. तुम्ही शपथ घ्या भगवा कायम फडकत ठेवा. मी तुम्हाला राज्यात भगवा फडकवून दाखवतो, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी महाडकरांना दिली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावरून थेट भाजपलाच आव्हान दिलं. मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला प्रबोधकार शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय. भाजपाचे हिंदुत्व काय आहे? गोमूत्रधारी. मेहबूबा मुफ्ती सोबत बसले. तुम्ही काय सोडले? भागवत मशिदीत गेले मी काही बोललो?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

तसेच उध्दव ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हणाले, जर हिंदूत्वाला डाग लावाल आणि भगव्याला झेंड्याला डाग लावाल तर तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भाजपाला दिला.

देशासाठी लढणारा आमचा, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाची भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. भाजपा आता भ्रष्ट जनता पार्टी झालीय. मेघालयात अमित शाहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. कुठे आहे हिंदुत्व? कुटुंब उद्ध्वस्त करायचे हे का तुमचं हिंदुत्व? मोदी व्यक्ती विरोधात नाही, वृत्ती विरोधात मी आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

भारत माता की जय म्हटले तो देशप्रेमी होत नाही. सैनिकाकडे बुलेट, जनतेकडे बॅलेट. सत्यपाल मलिकांकडे सीबीआय. इतर पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आज पंतप्रधान म्हणतायत मतदारांना बजरंगबलीचे म्हणा. मग तुमचे बळ, ५६ इंच छाती कुठे आहे? यापुढील प्रत्येक निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी म्हणून भाजपला तडीपार करा, असं आवाहनच त्यांनी केलं.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *