कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफानरीच्या प्रकल्पावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ या रिफायनरी प्रकल्पावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कोकणचा दौरा करत रत्नागिरी येथील स्व.प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या मैदानावर जाहिर सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनीही उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित कातळशिल्पे ही युनोस्कोच्या ताब्यात असून युनोस्कोच्या नियमानुसार या वारसा ठेवीच्या एक हजार मीटरच्या भागात कोणताही प्रकल्प उभारता येत नाही असे सांगत बाजारू लोकप्रतिनिधींना आणि परप्रांतीय लोकांना आपल्या जमिनिी कवडीमोल भावात विकू नका असे आवाहन केले.
मी त्यादिवशी अजित पवार यांना उद्देशून माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं की काकांकडे (शरद पवार) लक्ष द्या. ते कधी कोणती गोष्ट करतील सांगता येत नाही. असो तो त्यांच्या पक्षातील विषय आहे. आज कोकणात आलोय. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण ते प्रलंबित राहण्याची कारणं किंवा उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधी, पक्षांना निवडून देऊन तुम्ही आहे तसेच आहात. तीच तीच माणसं निवडून येत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनाही किंमत नाही. पण त्यांची त्यांची किंमत झालेलीच आहे असा उपरोधिक टोला शिंदे गटाच्या आमदारांबरोबरच ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींनाही राज ठाकरे यांनी टोला लगावला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, २००७ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. पण अजून काम सुरु झालं नाही. काय करताय तुमचे आमदार, खासदार, काय करताय तुमचे लोकप्रतिनिधी? कारण त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात. त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, काम केलं किंवा नाही केलं काय, ही माणसं निवडून देणारच आहेत. खाचखळग्यातून जाणारे तुम्ही, तुमच्याबद्दल या लोकांना आपुलकी शुन्य आहे. २००७ ला सुरु झालेला हा प्रकल्प १६ वर्षानंतरही तयार झालेला नाही.
तसेच राज ठाकरे म्हणाले, मी जेव्हा या रस्त्यावरुन गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. अहो त्या रस्त्याचं एकदा बघा. मला बोलले तुम्ही नितीन गडकरी यांच्याशी बोलून घेता का, मी बोललो त्यांच्याशी. नितीन गडकरी यांना फोन केला. इतकी वर्ष झाली रस्ता पूर्ण होत नाही. त्यावर म्हणाले, त्याचे कंत्राटदार पळून गेले. पळून गेले? ज्यांना आजपर्यंत निवडून दिले त्यांनी एकदा तरी विचारलं का, का पळून गेले? कारण या लोकांना फक्त तुमच्याशी मतदानाचा संबंध आहे.
तोच समृद्ध महामार्ग बघा, नागपूर पासून मुंबईपर्यंत, आता नाशिक, शिर्डीपर्यंत आला, सुरुही झाला ते सुद्धा चार वर्षात. नागपूर ते शिर्डी पुढचं काम सुरु आहे. पण आमच्याकडे १६ वर्ष कोकणात रस्ते होत नाहीयत. मी नेहमी सांगत आलो ना, तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. मतदानाचा दिवशी जीवंत राहा, म्हणजे झालं, बाकी तुम्हाला मोजतं कोण? आम्ही त्याच त्याच गोष्टींवर कोकण बोलतोय. पण आम्हाला त्या गोष्टीचा राग येत नाही. आम्हाला वाईट वाटत नाही. आज राज ठाकरे बोलून गेला. उद्या विसरुन जाणार आहात. मनाला लागतही नाही की अरे ते मनाला लागेल असा अपमान करत आहेत. पण आम्हाला त्याचं काही नाही असे सांगत शिंदे-फडणवीसांचे कौतुक करत ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींवर टीकाही केली.
तसेच रिफायनरी प्रकल्पावरून टीका करताना राज ठाकरे म्हणाले, आज आम्ही इथे भांडतोय, वाद चालू आहेत, प्रकल्प नाणारला होणार की बारसूला होणार? आता नवीन बारसू कुठून आलं? मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं. हे होताहेत कुठून? मला कोकणातल्या लोकांबद्दल आश्चर्य वाटतं. तुमच्या पायाखालून जागा निघून जाते, शंभर एकरची जमीन निघून जाते, पायाखालचे हजारो एकराचे पॅचेस निघून जातात तुम्हाला समजत नाही? कळत नाही कोणीतरी विकत घेत आहे म्हणून? सगळ्या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की प्रकल्प येत आहेत. ते कवडीमोल भावात तुमच्याकडून जमिनी खिशात घालतात, ज्यावेळी प्रकल्प जाहीर होतो तेव्हा हजारपट मोबदला घेऊन मोकळे होतात. नुसता व्यापार चालू आहे.
नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते. विरोध झाला, आता बारसूला आणला. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते, त्यांना विचारलं बारसूला किती जमीन हातात आली? ते म्हणाले १००० एकर आली. कशी आली? मुंबईहून गणपतीला कोकणाला येता, तेव्हा चर्चा करता तेव्हा तुमची जमीन गेलीय ते समजत नाही? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्यासमोर फिरत असतात. कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेतात. मग सरकारला बड्या दामात विकतात अशी टीकाही केली.
प्रत्येक राज्याला भारतरत्न असतात तसे महाराष्ट्राला आठ आहेत. आता आठवं मिळालं आहे. या आठमधील सहा भारतरत्न ही कोकणातील आहेत. इतका प्रतिभासंपन्न कोकण आहे आणि हे तुम्हाला मुर्ख बनवत आहेत. ज्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की, आपला शत्रू समूद्र मार्गाने येईल आणि आपली जमिनी घेईल आणि राज्य करेल. त्यामुळे महाराजांनी आरमार उभं केलं. कोकणच्या दोन भावांनी शिवछत्रपतींचं आरमार उभं केलं आणि सांभाळलं.
मराठ्यांनी महाराष्ट्राचा भगवा अटकेपार घडवला. पाकिस्तानील किल्ल्यावर भगवा लागला गेला. आम्ही जमीन ताब्यात घेतल्या. ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे राज्य आहे. अरे तुम्ही तुमच्या पायाखालची जमिनी काढत आहेत आणि अमराठी व्यापाऱ्याला विकत आहात. आपण कोणासाठी जमीन सोडत आहोत, काय करत आहोत याचं भान नाही? आमच्या जमिनी पायाखाली जात आहेत पण आम्हाला कळत नाहीय की, आम्ही कोणाच्या घशात जमीन घालतोय अशी चिंताही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
भाषणाच्या शेवटी जीपीएसद्वारे नाणार, बारसू येथील जमिन दाखवित कातळशिल्पेही छायाचित्रेही राज ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला दाखविली.