शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. शरद पवारांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी समितीची स्थापना केली होती. पण, या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला. यानंतर शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत पवारांनी अध्यक्षपदी कायम राहात असल्याची घोषणा केली.
माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. सर्वांनी दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. सर्वांनी केलेलं आवाहन आणि विनंत्या याचा विचार करून, तसेच मी अध्यक्षपदी कायम राहावे, हा समितीने घेतलेल्या निर्णयाचा मान राखून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं शरद पवारांनी जाहिर केले. त्यावेळी भाकरी फिरविणार असं आपण जाहीर केलं होतं. पण, राजीनामा मागे घेत भाकरी थापली आहे, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं.
मात्र, शरद पवारांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते,, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांचा रोख कोणाकडं होता, हे कळलं नाही.
एका सभेत बोलताना जयंत पाटलांनी म्हणाले की, शरद पवारांच्या राजीनाम्याने वादळ निर्माण झालं होतं. बरेच लोक देव पाण्यात ठेवून बसले होते. जे होत आहे, ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. शरद पवार नसते, तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, ही शक्यता आता मावळली आहे.
यावेळी बोलताना जयत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढत होती आणि या पुढेही जोमाने लढत राहणार. आज शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला. आता त्यांची नजर इतर पक्षांवर आहे. पण पवार साहेबांच्या भक्कम नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंधपणे काम करणार याचा दिलासा आपल्या सर्वांना काल मिळाला आहे. आज देशासमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या काळात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पवार साहेबांसारख्या नेतृत्वाने राजीनामा देऊन कसे चालणार होते. म्हणून आम्ही पवार साहेबांची मनधरणी करून पवार साहेबांना राजीनामा परत घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारलीही.
महाविकास आघाडीच्या असंख्य सभा आज राज्यभरात पार पडत आहेत. मात्र ज्या दिवशी ज्या शहरात सभा आहे त्याच शहरात भाजपतर्फे मोर्चे काढले जातात. या मोर्चांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात मात्र माध्यमे त्याला अधिक कव्हरेज देतात. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हेच भाजपचे ध्येय असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, आज देशात एक वेगळी परिस्थिती आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे, बेरोजगारीने तरुण पिढी हैराण झाली आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या महत्त्वाच्या विषयांवर भर न देता इतर गोष्टींकडे लोकांचे लक्ष वळवले जात आहे. दुर्दैवाने देशातील माध्यमेही यात सहभागी होत आहे.