Breaking News

या १०८ आदर्श आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा केला सन्मान गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

“विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल,” असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करताना मंत्री केसरकर बोलत होते.

शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असते. शासनाने नुकताच ६१ हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविला असून, त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षण क्षेत्रात यापुढेही अग्रेसर राहण्यासाठी तसेच अधिकाधिक रोजगार निर्माण होण्याच्या उद्देशाने व्यावसायिक शिक्षणावर तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यात भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल कौतुक करून शालेय शिक्षण विभागामार्फत देखील टीसीएस, टीआयएसएस, अमेझॉन आदींसोबत करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”

ग्रामपंचायतस्तरावर आदर्श महिलांचा सन्मान करणार – मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले, “शिक्षकांकडे उच्च गुणवत्ता असून ते निस्वार्थ भावनेने नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतात. अशा आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे, हा शासनाचा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या महिला धोरणांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर दोन आदर्श महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यातील किमान एक महिला शिक्षक असेल. प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष पुरविणारी भारतातील गुरूकुल शिक्षण पद्धती जगभरात अव्वल होती, याचा उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून राज्यात अधिक गुणवान पिढी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. गुणवत्ता पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी इतरांना प्रेरणा मिळेल असे कार्य करून आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी पायाभूत सुविधांसह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, यांचा ज्ञानदानासाठी योग्य वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०२१-२२ यावर्षीच्या १०८ पुरस्कार विजेत्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यासह पुरस्काराची रक्कम दहा हजार रूपये तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिले जाणारे एक लाख रूपये असे एकत्रित एक लाख दहा हजार रूपये पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या दिशादर्शिकेच्या ‘मंथली टेबल प्लॅनर’चे अनावरण करण्यात आले. प्रारंभी शिक्षण आयुक्त यांच्या प्रस्तावनेचे वाचन कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. तर संचालक कृष्णकुमार पाटील यांनी आभार मानले.

आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, संचालक (योजना) महेश पालकर, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादीः-

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *