Breaking News

उध्दव ठाकरे यांचे बंडखोरांना प्रत्युत्तर, बोलत नसलेले तिथे गेल्याने आता बोलू लागले बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर, संजय राठोड यांच्या वक्तव्यानंतर टीकास्त्र

इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर आणि बंडखोर आमदार संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना लगावला.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आदी जण उपस्थित होते.

विशेष म्हणजे या लोकांना मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल प्रेम आहे याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे. आजदेखील तिकडे गेल्यानंतरही आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे याबद्दल आहे धन्य झालो. पण हेच प्रेम गेली अडीच वर्ष जी लोक, पक्ष याच घरावर, कुटुंबियांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका करत होती, तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एकानेही त्याला विरोध केला नव्हता. ज्यांनी ही सगळी विकृत भाषा वापरली, अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात, त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात, मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या असे आवाहनही त्यांनी बंडखोरांना दिले.

तसेच त्यांच्या गाठीभेटीतून तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो आनंद तुम्हालाच लखलाभ असल्याचा टोला लगावत उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही जे सर्वसामान्य नागरीक आहेत, जे कष्टकरी आहेत, ज्यांच्याकडे काहीही नाही अशांचीच आहे. त्यामुळे जोपर्यत असे शिवसैनिक सोबत आहेत. तोपर्यत शिवसेना राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या हे गेले ते गेले असे म्हटले जात आहेत. मात्र सध्या कोणत्याच महानगरपालिका अस्तित्वात नाहीत. त्यामुळे नगरसेवक गेले असे म्हणू नका असे आवाहन प्रसारमाध्यमांना करत ते त्यांचे कार्यकर्त्ये त्यांच्यासोबत जात आहेत. तसेच ज्यांना त्यांच्या शिफारसीवरून तिकिटे दिली होती ते चाललेत. त्यामुळे शिवसेनेतून गेले अअसे म्हणता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी  उध्दव ठाकरे यांनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल अशी बंडखोरांची भूमिका स्पष्ट केली. तर दुसऱ्याबाजूला संजय राठोड यांनीही सन्मानाने बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी घेतला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *