Breaking News

राजीनाम्यानंतर रामदास कदम यांचा ठाकरे पिता-पुत्रांसह, अजित पवार, शरद पवारांवर हल्लाबोल पक्षातून हकालपट्टीच्या प्रश्नावर झाले भावूक होत रडले

शिवसेनेतील बंडखोरीची लागण रामदास कदम यांनाही झाल्यानंतर काल आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत शिवसेनेतील फुटीमागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप करत अजित पवारांवरही रामदास कदम यांनी निशाणा साधला.

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडत म्हणाले, माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक सवालही उध्दव ठाकरे यांना केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर रामदास कदम भावूक होत म्हणाले, ५२ वर्षे शिवसेनेसाठी काम केले. मला वाटलं नव्हतं की, आयुष्यांच्या शेवटच्या कालावधीत पक्षाकडून मला अशी वागणूक मिळेल असे सांगत असताना रामदास कदम यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. रडत रडतच ते म्हणाले, माझ्या मुलाचा अपमान केला, माझा अपमान केल्याचे सांगत तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारीला जास्तीचा फंड दिला असा आरोपही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत. ५० आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी यावेळी उध्दव ठाकरे यांना दिला.

मी गेल्या ५२ वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक यासाठी साक्षीदार आहे. दंगली झाल्या तेव्हा तिथे मी पोहोचलो होतो. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा मीच संघर्ष केला, असे सांगत नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला असेही ते म्हणाले.

५२ वर्ष काम करणाऱ्या एका शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ५१ आमदारांनी शिवसेना वाचवली असल्याने मी त्यांचे आभार मानतो असे सांगत माझ्या मुलाच्या मतदारसंघात १० कोटींचा निधी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कसा दिला, त्याची यादीच देतो आता मी. ही अवस्था शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे. अजित पवारांनी एक कलमी कार्यक्रम सुरू केला होता. ते सकाळी ७ वाजता मंत्रालयात जात होते. या माणसानं डाव साधला. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, तिथे त्यांच्या पडलेल्या आमदाराला निधी देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांचं १०० चं टार्गेट होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवला आणि अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्यामुळे त्यांनी तो डाव साधला असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते, असा दावाही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती, कोरोना होता हे मान्य. पण शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडत आहेत याचे फोटो मी तुम्हाला पाठवले होते. शिवसेनेतून कुणबी समाजाला फोडून त्यांना पदं द्यायची, पाच कोटी दिले. तुम्ही मुख्यमंत्री असतानाही शरद पवार शिवसेना फोडत आहेत. सगळे आमदार सांगत असतानाही तुम्ही शरद पवारांना सोडत नव्हता अशी खंत उध्दव ठाकरे यांच्याबाबत खंत व्यक्त करत ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभं केलं, ते आज जिवंत असते तर यांच्यासोबत युती करत हे पाप करुन दिलं असतं का?, अशी विचारणाही त्यांनी केली. शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, त्यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं, असा आरोप करत अडीच वर्षात हे घडलं म्हणून नशीब, अन्यथा पाच वर्षात संपूर्ण शिवसेना संपली असती असेही ते म्हणाले.

हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकत्र कसा येता येईल यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला उध्दव ठाकरे यांना देत गुवाहाटीत जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत तयार केलं होतं. पण येथे आजुबाजूला असलेले नेते बैल, कुत्रे, रेडे आणि महिला आमदारांना वेश्या म्हणू लागले. हा काय बिहार आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मी उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार, सभा, बैठका घेणार पण कोणालाही मातोश्रीवर बोलू देणार नाही, उद्धव ठाकरेंवर टीका करु देणार नाही. जे शरद पवार, अजित पवार यांना हवं आहे ते होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

उध्दव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं. शिवसेना पूर्ण संपण्याची वाट पाहू नका असा सल्ला देत म्हणाले, मी १९७० सालापासून गेली ५२ वर्ष शिवसेनेचं काम केलं आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारी शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या घोषवाक्याकडे आकर्षित होऊन मी पक्षाच्या कामासाठी झोकून दिलं आहे. माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं की माझ्यावर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल. आमचं उतरतं वय आहे. माझं ७९ वय सुरू झालं आहे. आमच्या आयुष्याची संध्याकाळ पक्षाच्या माध्यमातून अंधकारमय होईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मी उद्धव ठाकरेंना हात जोडून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बसू नका. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत संघर्ष करण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म संघर्ष केला. हिंदुत्व वाढवलं. आज सगळ्या जगात हिंदु हृदयसम्राट म्हणून बाळासाहेबांची ओळख आहे. साहेब गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्याच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकरतोय. मी उद्धव ठाकरेंना हे सांगून त्या दिवशी मी मातोश्रीवरून बाहेर पडलो, तो आजपर्यंत मातोश्रीची पायरी चढलो नाही. मला हे सहन झालं नाही. हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांचा नाहीये. शरद पवारांनी शेवटी डाव साधला. आमच्या मनात भीती होती तेच झालं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाळासाहेब भोळे आहेत. बाळासाहेब भोळे नव्हते. उद्धव ठाकरे भोळे आहेत. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना समजला नाही. आज शरद पवारांनी आमचा पक्ष फोडलाय असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आदित्य ठाकरेंचं वय काय आणि आमदारांना काय बोलतायत याचं भान ठेवा, असं सुनावत आदित्य ठाकरे हे कोणतंही शासकीय पद अथवा मंत्रीपद नसताना आधी आपल्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यासाठी सांगायचे असा दावा करत ते म्हणाले की, प्लास्टीक बंदी मी केली क्रेडीट आदित्य ठाकरेंना दिलं. मातोश्री मोठी होऊ द्या आपली असा विचार केला. मला कुठं माहिती होतं तेच आदित्य ठाकरे जे कालपर्यंत मला काका काका म्हणत होते ते मंत्रालयात माझं खातं घेऊन बसणार आहेत, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. आदित्यसाहेब… आता मला साहेब म्हणावं लागतं भाऊ. काय करणार?, असा टोला कदम यांनी लगावला आहे.

माझं वय ७० आहे पण आदित्यलाही मला साहेब म्हणावं लागतंय. म्हणतोय साहेब कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीमधले आहेत, असे खोचकपणे म्हणाले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *