Breaking News

अखेर ते १२ खासदार शिंदे गटात सहभागी; राहुल शेवाळे म्हणाले, युतीसाठी उध्दव ठाकरेंच… संजय राऊत यांच्यामुळेच युती होवू शकली नाही

शिवसेनेतील बंडाळीला ४० आमदारांसह १० अपक्ष आणि छोट्यापक्षासह अपक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ सहभागी झाले. त्यानंतर शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा शिवसेनेत रंगली होती. त्यानुसार आज अखेर खासदार राहुल शेवाळे यांच्यासह १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे म्हणाले, भाजपाबरोबरील युतीसाठी स्वत: उध्दव ठाकरे हे प्रयत्न करत होते. मात्र त्याच्याकडून सर्व प्रयत्न झाल्यानंतर आम्हाला सांगितले. त्यानुसार आम्ही प्रयत्न केले. आणि भाजपाबरोबर युती केल्याचे सांगत केवळ संजय राऊत यांच्यामुळेच भाजपाशी युती होवू शकली नाही असा गौप्यस्फोट केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजधानी दिल्लीत १२ खासदारांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी १२ खासदारांसह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी देखील आपली मतं मांडली असून संबंधित १२ खासदार शिंदे गटात सामील का झाले? याची कारणं दिली आहेत. यावेळी त्यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी लिहिलेला वचननामा देखील वाचून दाखवला आहे. यामध्ये देशाचं संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, शेतकरी आणि कामगारांचं हित, हिंदुत्वाचं रक्षण आणि राम मंदिराची उभारणी, गेल्या ६०-७० वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते करून दाखवण्यासाठी आपण युतीसोबत एकत्र राहू, असा वचननामा शेवाळे यांनी वाचून दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या ज्या उमेदवारांना आपण हरवलं आहे, त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केल्यानं शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांमध्ये सुरुवातीपासून नाराजी होती. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत पुन्हा एकदा युती स्थापन करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तब्बल १ तास चर्चा केली होती. त्यानंतर युतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज झाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी अडचणी आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

एकिकडे युतीसाठी चर्चा आणि दुसरीकडे भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई, यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज झाले. याबाबतचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी स्वत: आपल्याकडे केल्याचा दावा देखील शेवाळे यांनी केला. तसेच माझ्याकडून युतीसाठी प्रयत्न करून झाले आहेत, आता तुम्ही प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचंही शेवाळेंनी सांगितलं. त्यानंतर राहुल शेवाळे आणि इतर खासदार युतीसाठी प्रयत्न करत असताना, संजय राऊत यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या जात होत्या. तसेच भाजपाच्या विरोधात वक्तव्य करण्यात येत होती. त्यामुळे युती होऊ शकली नाही असेही ते म्हणाले.

तसेच राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार मूर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा घोषित केला. त्यामुळे खासदारांच्या मनात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर आम्ही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गारेट अल्वा चार वर्षे महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी होत्या, त्या काळात शिवसेनेला प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

मुर्म यांना पाठिंबा देण्यासंदर्भात मी उध्दव ठाकरे यांना पत्र दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठीही रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अपेक्षित होता. मात्र उध्दव ठाकरे यांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला. परंतु मागील वेळी अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेकडून एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे पत्र दिले नव्हते. त्यामुळे आम्ही आजही एनडीएसोबत असल्याचे सांगत उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदी धनखड यांना आम्ही मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज लोकासभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आम्ही त्यांना पत्र दिले असून आम्ही मुळ शिवसेना असून फक्त आम्ही गटनेता म्हणून राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळीच असल्याचे पत्र दिल्याचे सांगत आमचा वेगळा गट नाहीतर आम्ही शिवसेनाच असल्याचेही बिर्ला यांना सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही खासदार आणि उध्दव ठाकरे यांच्या चार पाच बैठका झाल्या. मात्र त्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आम्ही १२ जणांनी हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *