Breaking News

राज्यात दोन्ही काँग्रेस आणि समविचारी पक्षांना घेवून निवडणूका लढणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली.

या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसेपाटील, पक्षाचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आज वेगळया कामासाठी एकत्र येण्याचं ठरवलं होतं. परंतु मुंबई अध्यक्ष निवड करताना जिल्हया-जिल्हयाचे मत ऐकून घ्यावं असं मत समोर आलं. त्यामुळे त्या निर्णयानुसार निवड होणार आहे.

आज छगन भुजबळ असते तर मला आनंद झाला असता. मात्र ते बाहेर आले त्याचं समाधान नक्कीच आहे. ते बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबतीत अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही यश मिळेल अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली.

मुंबईमध्ये निवडणूका जवळ आल्याने संघटनेला व्यवस्थित चेहरा दयायचा आहे. यश-अपयश येतच असतं. परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते ती बांधिलकी तुम्ही ठेवली आहे असेही शरद पवार म्हणाले.

जुन्या लोकांना बरोबर घेवून नवीन चेहऱ्यांना संधी दयायला हवी. अधिक उत्साहाने काम करणारे व लोकांनी पसंद केलेले सर्व घटकातील लोक पुढे आणण्याची गरज असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. एक कामगारांची सामुहिक शक्ती पाहायला मिळत होती. गिरणगाव हे गिरणगाव आज राहिलेले नाही. वेगळया विचारांचा कामगार आज आला आहे. त्यामध्ये व्हाईट कॉलर कामगारांचा समावेश आहे. विशेष करुन त्यामध्ये शासकीय कामगार, अनेक संस्थामध्ये काम करणारा कामगार आहे. यांची संख्या व शक्ती वाढलीय त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचे आवाहन करतानाच सामुहिक संघटन उभं करण्याची गरज आहे. मध्यमवर्ग हा मतं तयार करतो. त्यांच्याशी संपर्क कसा वाढेल याची काळजी घ्यायला हवी असे मार्गदर्शनही शरद पवार यांनी केले.

सर्वांना एकत्र घेवून मुंबई शहरातील शक्ती जोमाने आणि समन्वयाचे वातावरण मुंबईत कसे राहिल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड करण्याबाबत आज मुंबई पक्ष कार्यालयात मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसेपाटील यांच्यासमोर उदया (शुक्रवारी) मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून मुंबई अध्यक्ष निवड केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे मुंबई अध्यक्ष निवड सर्वांचे म्हणणे ऐकून घेवून केली जाणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी या मुंबई नगरीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत असे स्पष्ट केले. शरद पवारसाहेबांचे विचार या शहरात रुजवण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत. राज्यात आपण बुथ लेवलचा कार्यक्रम राबवणार आहोत तोच कार्यक्रम मुंबईतही राबवला जाईल. वॉर्ड अध्यक्षांनी रोज एक चक्कर वॉर्डात मारावी ज्याच्यामुळे सामान्य माणसाच्या समस्या, त्यांचे प्रश्न कळतील. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून एकदा तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घ्यावी असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसेपाटील यांनी उदयापासून मुंबईतील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहे असे स्पष्ट केले. यावेळी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही गेल्या तीन वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली आणि  पक्ष कसा जोमाने वाढविला जाईल याबाबत मार्गदर्शन केले. या सभेचे सूत्रसंचालन माजी आमदार अशोक धात्रक यांनी केले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरद पवार यांचे मुंबई काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला.शिवाय पक्षाच्या इतर निवडीतील पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *