नाना पटोले यांचा सवाल, प्रचंड वाढलेले मतदार सरकारने बांग्लादेशातून आणले होते का? भाजपा सरकारच्या काळात मतदारही सुरक्षित नाही, मतदार याद्यातील घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा लढा.

भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? असा सवाल करत मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली ५८ टक्के मतदान दुसऱ्या दिवशी ६६.५ टक्के कसे वाढले? लाडकी बहिण योजनेचा लाभ बांग्लादेशींनी घेतल्य़ाचे सरकार सांगत आहे तसे विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजपा सरकारने बांग्लादेशातून आणले का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

लोकशाहीचे रक्षण व मतदारांची जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलन केल्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मतमोजणीवेळी एक-दोन मतदार वाढले तरी निवडणूक रद्द होते, पण विधानसभेला ६० लाख मतदार वाढले पण त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देत नाही. रात्रीच्या अंधारत ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाने अजून दिलेले नाही. पण हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करत त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांना ती स्क्रिप्ट नरेंद्र मोदी, अमित शाह, का निवडणूक आयोगाने दिली होती, अशी विचारणाही यावेळी केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणूक २०१९ ते २०२४ या पाच वर्षात राज्यात ५० लाख मते वाढली तर लोकसभा निवडणूक २०२४ व विधानसभा निवडणूक २०२४ या सहा महिन्यात ४६ लाख मते वाढली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले कसे, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही, आता तर निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरून सर्व डेटाच डिलीट केला आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीचे रक्षण व निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर व न्यायालयीन लढा देत असल्याचेही यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकशाहीच्या रक्षणासाठी व मतदार जागृतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले. तसेच पत्रकार परिषदाही घेतल्या. नागपूरमध्ये प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार व निवडणूक आयोगावर तोफ डागली. मुंबईत प्रोफेशनल काँग्रेसचे प्रविण चक्रवती व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापुरात खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले. अहिल्यानगर मध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. पुणे, सोलापूर, नाशिक, नांदेड, बीड, जालना, लातूर, वाशीम, पैठण, ब्रम्हपुरी सह जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *