Breaking News

दिल्लीतून होणार भाजपच्या खासदारांचा प्रचार प्रत्येक राज्यातील राजकिय, जातनिहाय आणि प्रश्नांची माहिती मुख्यालयात जमा

मुंबई: प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. मात्र सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केल्याचे दिसून येत असून यंदाच्या निवडणूकीत संख्याबळ वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिक पातळीवरील खासदाराच्या प्रचारासाठी दिल्लीतून यंत्रणा हालविण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सद्यपरिस्थितीत प्रत्येक राज्यातील भाजपची मूळ असलेली ताकद आणि एनडीएतील घटक पक्षाची ताकद यांची चाचपणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्या त्या राज्यातील जातनिहाय लोकसंख्या, प्रामुख्याने भेडसावणारे प्रश्न आणि भावनिक मुद्यांची यादीही जवळपास तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक टप्प्यानुसार त्या त्या अनुषंगाने निवडणूकीला उपयुक्त ठरतील अशा मुद्यांचा वापर प्रचारात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पध्दतीचा प्रत्येक राज्यातील जिल्हानिहाय माहिती भाजपच्या दिल्लीस्थित कार्यालयात आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी मागील निवडणूकीच्या धर्तीवर यंदाही एका खाजगी जाहीरातदार कंपनीची नियुक्ती करण्याचे काम सुरु आहे.  निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर नियुक्त कंपनीकडून प्रचाराच्या कामास सुरुवात करण्यात येणार असून प्रत्येक प्रांत आणि राज्यातील भाषेनुसार प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रचाराची सर्वच सूत्रे दिल्लीतून हलविण्यात येणार असल्याने प्रत्येक खासदाराला स्वतंत्र यंत्रणा न राबविण्याचे आदेशही खासदारांना देण्यात आले आहेत. त्या उपरही एखाद्या खासदाराला स्वतःसाठी प्रचार करावयाचा असेल तर पक्षाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

Check Also

­­पुणे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराविरोधात तक्रार

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने केलेल्या निवडणूक आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *