उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सूत्रधार नवनीत राणा यांचा कार्यकर्ता; पोस्टवरून उघड नवं वळण लागण्याची शक्यता

मुस्लिम समुदायाचे श्रध्दास्थान असलेल्या महम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या भाजपा प्रवक्त्या नूपूर शर्मा हिच्या समर्थनार्थ पोस्ट समाज माध्यमात फॉरवर्ड केल्यामुळे आपल्या प्राणास मुकावे लागलेल्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इरफान खान हा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इरफान खान याने खासदार नवनीत राणा यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केल्याची बाब चर्चेत आली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शेख इरफान याच्या समाज माध्यमावरील ‘पेज’वर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासोबतची छायाचित्रे समोर आल्याने वाद उफाळून आला आहे. खासदार नवनीत राणा या गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होत्या. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. परंतु मागील काही महिन्यापासून त्या भाजपाच्या समर्थक बनल्या आहेत. तर त्यांचे पती आमदार रवि राणा हे भाजपा समर्थक म्हणून ओळखले जातात.  यावेळी अल्पसंख्याक समुदायातील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जुळले होते. या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे प्रचारही केला होता. अमरावतीच्या कमला ग्राउंड परिसरात राहणारा इरफान खान हा ‘रहबर हेल्पलाईन’ ही स्वयंसेवी संस्था चालवतो. इरफान याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राणा यांचा प्रचार केल्याचे त्यांच्या समाज माध्यमातील पोस्टवरून स्पष्ट होत आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इरफान खानचा युवा स्वाभिमान पक्षाशी कोणताही संबंध नाही. विरोधकांनी आकसातून खोटे आरोप सुरू केले आहेत, असे रवी राणा यांचे म्हणणे आहे. उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्याविषयी अवाक्षरही काढलेले नाही. हे प्रकरण कोणाच्या दबावाखाली दडपले जात होते, हे समोर यायला हवे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *