राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाऐवजी स्वतःच्या तब्येतीचे वैद्यकीय कारण देत मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन तासांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा यांचा स्विकारला असल्याचे जाहिर केले. तसेच पुढील कारवाईसाठी तो राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती दिली.
दरम्यान संध्याकाळी राज्यपाल भवनाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा पाठविलेला राजीनामा स्विकारला असल्याचे जाहिर केले. त्यामुळे नव्याने सत्तास्थानी विराजमान झालेल्या महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पिय अधिवेशनात एका मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात भाजपाबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे यश म्हणावे लागेल.
वास्तविक पाहता धनंजय मुंडे यांचा राजीनामा नेमका कोणी घ्यायचा यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अप्रत्यक्ष टोलवा टोलवी सुरु होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार की नाही असा सवालही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत होता. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या एक दिवस आधी रात्री उशीराने काही प्रसारमाध्यमातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या क्रुर मारहाणीचे फोटो काही व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे राजकिय वर्तुळातून सांगण्यात आले.
त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला खरा पण राजीनामा संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या फोटोमुळे नव्हे तर वैयक्तिक प्रवृती अस्वस्थामुळे आणि उपचारासाठी देण्यात येत असल्याचे कारण दिले. त्यामुळे राजीनामा देतानाही धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणा आपला संबध नाही असेच दाखविण्याचा प्रयत्न केला.
Marathi e-Batmya