Breaking News

७३४ रिक्त पदे भरा, अन्यथा प्रशासनाने कामाची अपेक्षा करू नये शिधावाटप कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी
सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई/ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी/अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करून सातत्याने अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम करत आहेत. मात्र मंजूर पदांपैकी ७३४ पदे अद्यापही रिक्त असून ती तातडीने भरण्याची मागणी शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी केली असून ही पदे भरणार नसाल तर कामाची अपेक्षा बाळगू नका असा इशारा त्यांनी दिला.
मुंबई/ठाणे विभागातील प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत सुमारे ४२२३ शिधावाटप दुकानात मार्फत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. यंत्रणेतील शिधावाटप अधिकारी, सहाय्यक शिधावाटप अधिकारी, शिधावाटप निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम चोखपणे बजावत आहेत. अन्नधान्याचा कुठेही काळाबाजार होणार नाही, याकरिता ४४ दक्षता पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. मुंबई शहरात कोरोना विषाणूचा विळखा पडलेला असताना शिधावाटप कर्मचारी अधिकारी जीव मुठीत घेऊन जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे कर्तव्य प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून पार पाडत आहेत, परंतु शिधावाटप यंत्रणेतील अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचारी/अधिकारी यांचेवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे. यंत्रणेतील एकूण १८९० मंजूर पदांपैकी केवळ ११५६ पदे भरलेली असून ७३४ पदे रिक्त आहेत. त्यात सहाय्यक नियंत्रक शिधावाटप ०७, शिधावाटप अधिकारी १९, सहाय्यक शिधावाटप अधिकारी २२, शिधावाटप निरीक्षक २३६ व इतर ४५० पदे रिक्त आहेत. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप रिक्त पदे भरण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
यापार्श्वभूमीवर सदर पदे प्रशासनाने तातडीने भरावीत अन्यथा प्रशासनाने कर्मचाऱ्यांकडून कामाची अपेक्षा करू नये असा इशारा त्यांनी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *