माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पुण्यातील एका कंपनीवर मेहरबान होत ३२०० कोटींची कामे दिली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. आता या ३२०० कोटी रूपयांच्या निविदेच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे.
आरोग्य विभागाचा कारभार तानाजी सावंत यांच्याकडे असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या, रूग्णवाहिकांची खरेदी यासह अनेक गोष्टीत अनियमतता झाल्याचा आरोप सावंत यांच्यावर झाला होता. त्याचबरोबर सर्व शासकिय रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे साफसफाईचे कंत्राट एका बाह्य कंपनीला देण्यात आले होते. यासाठी ६६८ कोटी प्रतिवर्ष याप्रमाणे ३ हजार १९० कोटी रूपयांचे कंत्राट पुण्यातील एका कंपनीला दिले होते. त्या कंत्राटाला आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली.
या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात सुरु असलेला सुप्त संघर्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. परंतु शिंदे गटाचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, या निर्णयामागे पक्षिय कारण नाही. तसेच आरोग्य विभागच नाही तर प्रत्येक सरकारी विभागात नियमानुसार काम झाले पाहिजे. आम्ही जनतेला उत्तरदायी असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करत शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी करत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जी कामे झाली. त्यात केवळ भ्रष्टाचारच झाला, त्यावेळी आरोग्य मंत्री कोण होते, भाजपातून भ्रष्ट मंत्र्यांना विरोध झाला. त्यापैकीच एक आरोग्य मंत्रीही होते. आरोग्य खाते हे जनतेशी थेट संबधित असते, पण त्यात भ्रष्टाचार होत असेल तर ते योग्य नाही. मुख्यमंत्रीच भ्रष्टाचार थांबवित असतील तर त्याचे स्वागतच करू असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya