Breaking News

भीमा कोरेगांव घटनेचे मुंबईसह राज्यभरात पडसाद शरद पवारांसह मुख्यमंत्री आणि संभाजी ब्रिगेडकडून शांतता राखण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांव, वढू बु. आणि शिक्रापूर सह चार गावात अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करत दंगल घडविली. या घटनेचे पडसाद राज्यातील मुंबईसह औरंगाबाद, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला येथे उमटले असून दलित कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आणि बंदची हाक दिली.

भीमा कोरेगांव येथे दगडफेकीच्या घटनेचे वृत्त कळताच औरंगाबादेत ठिकठिकाणी दलित कार्यकर्त्यांनी मोर्चे काढत बाजारपेठा बंद करण्यास सुरुवात केली. संध्याकाळ अखेर शहरात मोठ्या प्रमाणावर वातावरण तंग बनल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादेत संचारबंदी जारी केली आहे.

तर सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमालांनी काम बंदची हाक देत बाजारातील व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर हैद्राबादला जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. बीड, हिंगोली, नांदेड, अकोला येथेही दलित कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन कर ठिकठिकाणी बंदची हाक दिली. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबईतही चेंबूर, मुलुंड, पनवेल येथे दलित कार्यकर्त्यांनी बंदची हाक देत कालच्या घटनेच्या विरोधात घोषणा देत आंदोलन सुरु केले आहे. तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दलित आणि मराठा समाज बांधवाना शांतता राखण्याचे आवाहन करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी शांतता राखावी असे आवाहन केले.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत जाहीर करत सदर घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा मार्फत करण्याची घोषणा करत जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत. त्यांनी तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न थांबवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संभाजी ब्रिगेड या संघटनेनेही यासंदर्भात राजकारणाला बळी पडून मराठा-दलित दंगल होवू देवू नका आणि शांतता राखा असे आवाहनही केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *