बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, भाजपाचे सुरेश धस, अजित पवार यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंखे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आदींसह सर्व पक्षाच्या आमदारांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने राज्यपालांची आज भेट घेतली.
राज्यपाल सीपी सुब्रमण्यम यांची भेट घेत बीडमधील विद्यमान परिस्थितीची माहिती तसेच वाल्मिक कराड यांच्या दहशतीची आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या अवैध धद्यांची आणि गुंडगिरीची माहिती दिली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोश देशमुख यांच्या हत्याच्या कथित कहाण्याही यावेळी राज्यपालांच्या कानावर घालत विद्यमान मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबधही यावेळी दाखवून देण्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक तर बिनखात्याचा मंत्री करावे किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही या सर्वपक्षिय आमदार-नेत्यांकडून राज्यपालांकडे करण्यात आली.
सर्वपक्षिय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली. ही माणूसकीची हत्या आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड याच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यातून सहज बाहेर पडू शकतो. त्यामुळे त्याच्या विरोधात ३०५ कलमातंर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
पुढे बोलताना संभाजी छत्रपती म्हणाले की, या सगळ्याचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. लोकांचा आक्रोश असताना अंतुले, आर आर पाटील, मनोहर जोशी, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. क्लिन चीट मिळाल्यानंतर पुन्हा ते या पदावर विराजमान झाले. मग अजित पवार हे धनंजय मुंडे यांना संरक्षण का देत आहेत असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, याप्रकरणी राज्यपालांनी लक्ष्य घालण्याचे आश्वासन दिलं आहे. हा महाराष्ट्र शिवाजी महाराज आणि शाहु महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा संताचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत त्या दुर्दैवी आहेत. हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी मराठा विरूद्ध वंजारी अशा मार्गावर गेला आहे. मात्र हा विषय मराठा विरूद्ध वंजारी असा विषय नाही. दलित समाजाच्या मुलाला वाचवायला संतोष देशमुख गेला होता असेही यावेळी सांगितले.
तर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे प्रकरण गुंडागर्दी दहशतीचे प्रकरण आहे. त्यामुळे याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अजित पवार यांनी तो घ्या अशी मागणी केली. तसेच ज्या अर्थी शरद पवार यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे यावरून दिसून येत असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya